पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत. हजारोंच्या संख्येने राज्यभरातील मराठा बांधव आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. राज्य सरकारविरोधात तीव्र प्रतिक्रिया आंदोलनकर्ते देत आहेत. या सर्व घडामोडीदरम्यान राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

पुणे शहराचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे पुणे दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मागील ४० ते ५० वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी होत आहे. पण देवेंद्र फडणवीस हे २०१४ ते २०१९ या दरम्यान मुख्यमंत्री असताना त्यांनी सर्वात प्रथम मराठा समाजाला आरक्षण दिल. आरक्षण उच्च न्यायालयामध्ये टिकवले, पंरतु त्यानंतर राज्यात दुर्दैवाने महाविकास आघाडीचे सरकार आले आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयात ते आरक्षण गमावले, पण त्यानंतर आता राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. त्यामुळे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो, मराठा समाजाच्या सर्व मागण्यांसहित आरक्षण देण्याचे काम हेच सरकार करू शकतं, अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

मराठा समजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलनास बसले आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्य सरकार मराठा समाजाला निश्चित आरक्षण देईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे ओबीसी समाज अधिक आक्रमक झाला असून आरक्षणाच्या मागणीचा जोर धरला आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले, ओबीसी किंवा मराठा या दोन्ही समाजाचा विचार करता, हे राज्य सरकार दोन्ही समाजाला समान पद्धतीने न्याय देण्याच काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.