पुणे: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे राज्यभरात जनजागृती आणि शांतता रॅली काढत आहेत. तसेच प्रत्येक ठिकाणी सभा घेऊन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांबाबत भूमिका मांडत आहेत. प्रत्येक ठिकाणी होत असलेल्या रॅली आणि सभांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ठीक नसताना देखील ते उपचार घेऊन राज्यभर दौरे करून रॅली आणि सभा घेत आहेत. हेही वाचा : पोलीस कोठडीतील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, तपास सीआयडीकडे त्याच दरम्यान काल (११ ऑगस्ट) पुण्यातील सारसबाग येथून डेक्कनच्या दिशेने मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला पाच वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. तर डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ रॅली ९ वाजण्याच्या सुमारास समाप्त झाली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल तासभर उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. पण भाषणावेळी काही काळ भाषण उभा राहून केल्यावर मध्येच खाली बसून त्यांनी भाषण केले. त्यामुळे त्यांची अद्यापही तब्येत ठीक नसल्याचे दिसून आले. जवळपास तासभराच्या भाषणानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने जवळील सह्याद्री रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.