पुणे : पुणे महापालिका प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिकेवर हंडा मोर्चा काढत निषेध नोंदविला. तर यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
यावेळी साईनाथ बाबर यांनी प्रतिक्रिया दिली, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणात मुबलक पाणी साठा आहे. तरीदेखील महापालिका प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय घेतला. त्यात दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला असून दुसर्या दिवशी कमी दाबाने पाणी येत आहे. तसेच अनेक ठिकाणी गढूळ पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना अटक; २२ दुचाकी जप्त
पुणे महापालिकेमध्ये भाजपची सत्ता होती. त्यावेळी शहरातील अनेक भागात पाण्याच्या टाक्या बांधल्या जातील अशी घोषणा केली होती. त्यातील काही टाक्यांची कामं झाली आहेत. तर काही टाक्या धूळखात पडून आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम्ही आज महापालिका प्रशासनाविरोधात हंडा मोर्चा काढत निषेध नोंदवित आहोत. या आंदोलनाची दखल महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी घ्यावी अन्यथा आम्ही अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी दिला.