पुणे : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन अर्थात सीआयएससीई मंडळाने जाहीर केलेल्या दहावी (आयएससीई) आणि बारावीच्या (आयएससी) परीक्षांच्या निकालात शहरातील बहुतांश शाळांचा निकाल १०० टक्के लागला. अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण पटकावले.
लष्कर भागातील बिशप्स स्कूलच्या वीरेन लुनिया या दहावीच्या विद्यार्थ्याने ९८ टक्के गुणांसह शाळेत पहिला क्रमांक मिळवला. बारावीच्या परीक्षेत पवित्रा कुमार, ओजस देशपांडे, विदिती भंडारी आणि आदित्य चौरे यांनी ९८.५ टक्के गुणांसह संयुक्त प्रथम स्थान पटकावले. कल्याणीनगर येथील बिशप्स स्कूलमधील मीरा सेल्वाडोराय हिने ९८.८० टक्के, तर उंड्री येथील बिशप्स स्कूलमधील भाविशा अगरवाल हिने ९८.४० टक्के गुण मिळवले. क्लाइन मेमोरियल स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. शरण्या चव्हाण, रुचा डेरे आणि शंतनू वाल्हेकर या तिघांनी ९६.२ टक्के गुणांसह पहिला क्रमांक पटकावला. सृष्टी शिंदे आणि गार्गी पेटकर यांना ९५.८ टक्के गुण मिळाले.
लोहगाव येथील कावेरी इंटरनॅशनल स्कूलमधील आर्यन मालुसरे याने ९५ टक्के गुण प्राप्त केले. सेंट मेरीज स्कूलच्या दहावी आणि बारावीचा निकाल १०० टक्के लागला. त्यात दहावीच्या अविशा जॉन या विद्यार्थिनीने ९९.३ टक्के, तर बारावीच्या डिशा लुंकार हिने ९८.७५ टक्के गुण मिळवले. ‘निकाल पाहून खूप आनंद झाला. माझ्या यशाचे श्रेय पालक आणि शिक्षकांना आहे. दररोज चार ते पाच तास अभ्यास करायचे. गरजेनुसार जास्त वेळही अभ्यास व्हायचा,’ अशी भावना अविशाने व्यक्त केली.
बालेवाडी येथील ‘विबग्योर हाय’ शाळेतील रिद्धिमा गोस्वामीने ९९.२० टक्के, विदित जैनने ९९ टक्के, तर नीन्व घोषने ९७.८३ टक्के, मगरपट्टा सिटी येथील विबग्योर हायस्कूलच्या रेहान अरोराने ९८ टक्के, एनआयबीएम येथील विबग्योर हाय शाळेच्या सारा शेट्येने ९८.८४ टक्के गुण मिळवले. विद्या प्रतिष्ठानच्या मगरपट्टा येथील सिटी पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. त्यात मनस्वी देशपांडे हिने ९८.८ टक्के, आदित्य गुप्ता, साहिल गुप्ता, यश जगदाळे आणि शर्वी शिंपी या चौघांनी ९८.६ टक्के, तर भार्गव कविटके याने ९८.४ टक्के गुण मिळवले.
नांदेड सिटी पब्लिक स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. त्यात अदिती गौराजे या विद्यार्थिनीला ९८.२० टक्के, वृषाली हावळेला ९८ टक्के, तर ग्रीष्मा पहाडेला ९७.४० टक्के गुण मिळाले. वाकड येथील विस्डम वर्ल्ड स्कूलच्या विराज देसाई या विद्यार्थ्याला ९९.२ टक्के, भाव्या सिंग या विद्यार्थिनीने ९९ टक्के गुण प्राप्त केले. हडपसर येथील विस्डम वर्ल्ड स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. त्यात अदिती पवार, सम्योजॉय दास यांना ९८.६ टक्के, त्रिशा पटानीला ९८.१ टक्के गुण मिळाले. सूस येथील विद्या व्हॅली स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. त्यात आर्यमान देशमुखने ९८.८ टक्के, भौमिक पंजाबीने ९८.५ टक्के, क्षितिज जोशीने ९८ टक्के गुण मिळवले.