मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून आमरण उपोषणास बसले आहेत. मनोज पाटील यांना मंगळवारी उपोषण मागे घेण्याचीही विनंती करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यातील विधानाचा मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध करण्यात आला.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्यस्तरीय बैठक झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेपूर्वीचा हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जाते. व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेच्या ठिकाणी येताच “आपण बोलून मोकळं व्हायचं, निघून जायचं”, असं म्हटल्याचं माईकमध्ये रेकॉर्ड झालं. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना माईक चालू असल्याची आठवण करून दिली. पुढे अजित पवारही त्यावर “येस, येस” म्हणताना दिसत आहेत. यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याबाबत मराठा समाजाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

हेही वाचा – कर्नाटकातील वैद्यकीय महाविद्यालय विकायला काढले आणि ‘अशी’ केली फसवणूक

आज पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या त्या संपूर्ण विधानाचा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, राजेंद्र कुंजीर, बाळासाहेब अमराळे, सचिन आडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन निषेध केला.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणाले की, मागील कित्येक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देत आहे. पण कोणत्याही सरकारने मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेतला नाही. त्या विरोधात ५८ मोर्चे शांततेच्या मार्गाने काढले. पण काहीच झाले नाही. विधिमंडळात वेगळे, सभेत वेगळे विधान आणि शिष्टमंडळासमोर वेगळी भूमिका मांडण्याचे काम राज्यकर्त्यांनी केले आहे. या सर्व राज्यकर्त्यांनी मराठा समाजासह सर्वांची फसवणूक केली आहे. या सर्व गोष्टींना कंटाळून मनोज जरांगे हे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. मनोज जरांगे यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी केली.

हेही वाचा – पीएमपीत गुगल पे, फोन पेद्वारे तिकीट काढण्याची सुविधा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी एक व्हिडीओ समोर आला आहे. त्या विधानाचा मराठा समाज निषेध व्यक्त करीत असून मराठा समाजाचा अंत पाहू नये, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकानी राज्य सरकारला दिला.