तब्बल २३ वर्षे अभ्यागत संपादकपदापासून ते महामंडळाचे अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या ज्येष्ठ समिक्षक रा. ग. जाधव यांनी मराठी विश्वकोश निर्मितीस खऱ्या अर्थाने आकार दिला. वाईतील त्यांच्या या तब्बल २३ वर्षांच्या आठवणींना उजाळा देताना मराठी विश्वकोशाचा आधार हरपला अशी भावना व्यक्त होत आहे.

मराठी विश्वकोश महामंडळामध्ये १९७० साली अभ्यागत संपादक म्हणून जाधव दाखल झाले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना गुरुस्थानी मानणाऱ्या जाधवांनी पुढे मानव्य विद्या कक्षाचे विभाग संपादक, प्रमुख संपादक आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष म्हणून तब्बल तेवीस वर्षे काम केले. मराठी विश्वकोश अद्ययावत व्हावा, इंग्रजी ब्रिटानिकाच्या धर्तीवर विश्वकोश जगातील अत्युच्च संदर्भग्रंथ व्हावा असा त्यांना सतत ध्यास होता.

विश्वकोशातील १९८९ पर्यंतच्या कार्यकाळात रा. ग. जाधव यांनी तेराव्या खंडापर्यंत काम केले. या काळात त्यांनी मानव्य विद्या कक्षातील नोंदीचे संपादन केले. शिवाय या खंडातून साहित्य विषयक महत्त्वाचे लेखही त्यांनी लिहिले. विश्वकोश आकर्षक होण्यासाठी विश्वकोशातील लेखांसोबत चित्रे लावण्यातही जाधव यांनी पुढाकार घेतला. विश्वकोश निर्मिती वेळेवर आणि गतीने व्हायची असेल तर या कामाला शिस्त हवी असे त्यांचे मत होते. यासाठी त्यांनी लेखन, समीक्षण, संपादन, छपाई, मुद्रितशोधन यांचे काटेकोर वेळापत्रक आखले आणि त्याची अंमलबजावणीही केली. त्यामुळेच त्यांच्या निवृत्तीपूर्वीच परिभाषा खंडासह बारा खंड प्रकाशित झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर विश्वकोशाचे काम पुन्हा रखडले. यातच त्यांच्या कामाचे मोल लक्षात येते. १९ वर्षांच्या सेवेनंतर १९ जानेवारी २००१ रोजी जाधव यांची मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष आणि प्रमुख संपादक म्हणून नियुक्ती झाली. या काळात त्यांनी सतराव्या खंडापर्यंतचे लेखन-संपादनाचे काम पूर्ण केले होते.

विश्वकोश निर्मितीवेळी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि जाधव या दोघांत चर्चा होत असत. नोंदींबाबतचा काटेकोरपणा शास्त्रीजींकडूनच जाधव यांच्याकडे आला होता. विश्वकोश कार्यालयातील अन्य संपादकांशी ते विविध विषयांवर नित्य चर्चा करत. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल अनेकजण आजही आठवणी काढतात. डॉ. जाधव जोशींना गुरुस्थानी मानत होते. तर्कतीर्थाचे निधन २७ मे १९९४ ला झाले. बरोबर त्यांच्या बाविसाव्या स्मृतिदिनी डॉ. जाधव यांचेही देहावसान झाले.

विश्वकोश महामंडळाची श्रद्धांजली!

मराठी विश्वकोश महामंडळाचे माजी अध्यक्ष व मानव्य विद्या कक्षाचे विभाग संपादक प्रा. रा. ग. जाधव यांना महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती महामंडळाच्या वाई व मुंबई कार्यालयात आज श्रध्दांजली वाहण्यात आली. जाधव यांच्या निधनाने मराठी साहित्य संस्कृतीतील ज्ञानोपासक हरपला आहे. त्यांच्या समीक्षेचे क्षेत्र व्यापक होते आणि वाचकांची साहित्यिक जाण वाढविण्यामध्ये त्यांच्या समीक्षेचा खूप मोठा वाटा होता. संत साहित्यापासून चित्रपटांपर्यंत विविध क्षेत्रांकडे पाहण्याची नवी व प्रगल्भ दृष्टी त्यांनी निर्माण केली, अशी भावना कार्यालयातील सहकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. यावेळी डॉ. सु. र. देशपांडे, डॉ जगतानंद भटकर, प्रा. वसंतराव चौधरी, कृ.म. गायकवाड यांनी त्यांच्या विश्वकोशातील कार्यकर्तृत्वाविषयी गौरदगार काढले.