कोणतीही शासकीय योजना वा निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठीची आर्थिक तरतूद कुठून आणायची हा सरकारपुढे पहिला प्रश्न असतो. प्रचंड संख्येने असलेल्या असंघटितांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी मोठय़ा निधीची आवश्यकता आहे. मात्र असंघटितांमधील हमालांसारख्या घटकांना माथाडी कायद्यामुळे निवृत्तिवेतन सोडून सर्व सामाजिक सुरक्षा मिळत आहे. त्यासाठी सरकारवर एक रुपयाही बोजा पडत नाही, यंत्रणा उभी करावी लागत नाही. अशारीतीने किमान शासकीय हस्तक्षेपात असंघटितांना सामाजिक सुरक्षा देणारा माथाडी कायदा हा महाराष्ट्राचा आदर्श व आगळा कायदा आहे, असे गौरवोद्गार दिल्लीचे अतिरिक्त कामगार आयुक्त डॉ. राजेंद्र धर यांनी येथे काढले.
माथाडी कायद्याची अंमलबजावणी आणि माथाडी मंडळाचे कामकाज यांची पाहणी करण्यासाठी डॉ. बाबा आढाव यांच्या निमंत्रणावरून डॉ. धर यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली सरकारची त्रिसदस्यीय समिती पुण्यात आली होती. दिवसभराच्या कामकाज समारोपाच्या वेळी डॉ. धर बोलत होते. केंद्रशासित प्रदेश लोकसेवेतील अधिकारी आर. के. गौर, दिल्ली किमान वेतन मंडळाचे सदस्य कृष्णकुमार यादव, दिल्ली येथील हमाल पंचायतीचे कार्यकत्रे प्रकाशकुमार यांचीही या वेळी प्रमुख उपस्थिती होती. दिल्लीमध्ये या कायद्याच्या तरतुदी कशा लागू करता येतील याविषयी दिल्ली सरकारपुढे आम्ही प्रस्ताव ठेवू, असे डॉ. धर यांनी या वेळी सांगितले.
गेल्या दोन वर्षांत हमाल पंचायतीने डॉ. बाबा आढाव, नीतिन पवार, गोरख मेंगडे यांच्या पुढाकाराने देशपातळीवर काम करण्यासाठी दिल्लीत राष्ट्रीय हमाल पंचायतीची स्थापना केली आहे. देशाच्या राजधानीत हमालांसह सर्वच कष्टकऱ्यांची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. येथे महाराष्ट्रासारखा माथाडी कायदा लागू करावा, अशी मागणी डॉ. आढाव यांनी आधी मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल व नुकतीच कामगार मंत्री गोपाळ राय यांच्याकडे केली होती. त्यावर एक त्रिसदस्यीय समिती पुण्यात येऊन माथाडीच्या अंमलबजावणीची पहाणी करेल, असे आश्वासन राय यांनी दिले होते. त्यानुसार डॉ. धर यांच्या नेतृत्वाखालील समिती पुण्यात आली होती.
समितीने गुलटेकडी येथील भाजीपाला-फळ बाजार, भुसार बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय, पुणे माथाडी मंडळाचे कार्यालय येथे भेट देऊन पाहणी व चर्चा केली. या ठिकाणी समितीचे उपसभापती भूषण तुपे, उप सचिव ज्ञानेश्वर आदमाने, माथाडी मंडळाचे िपपरी अध्यक्ष व सहायक कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ, सचिव कैलास मुजूमले, वरिष्ठ निरिक्षक भास्कर गाडे, पुणे र्मचटस चेंबरचे माजी अध्यक्ष वालचंद संचेती, पुणे मोटार गुडस ट्रान्सपोर्टचे राम कदम, कृष्णा मोरे अशा प्रशासन, मालक संघटनेच्या पदाधिकारी, प्रतिनिधींनी समितीचे स्वागत केले व अगत्याने या कायद्यामधील त्यांच्याशी संबंधित घटकांविषयी माहिती दिली. या वेळी डॉ. बाबा आढाव यांच्यासह सुभाष वारे, प्रकाशकुमार, पंचायतीचे सरचिटणीस नवनाथ बिनवडे, संघटक गोरख मेंगडे, छ. शिवाजी मार्केटयार्ड युनियनचे अध्यक्ष नीतिन जामगे, सरचिटणीस संतोष नांगरे, म. फुले कामगार संघटनेचे अध्यक्ष अंकुश हरपुडे, तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, सचिव राजेश मोहोळ उपस्थित होते. समितीने पंचायतीच्या हमाल नगर, हमाल भवन, पतसंस्था, कष्टकरी विद्यालय, स्वप्नपूर्ती गृहप्रकल्प, कष्टाची भाकर इ. उपक्रमांनाही भेट दिली. डॉ. आढाव यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी अविश्वसनीय विश्व उभे केले आहे, असे प्रशंसोद्गार समिती सदस्यांनी या वेळी काढले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mathadi law important for society
First published on: 25-05-2016 at 04:05 IST