प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये राज्यात विजेची मागणी वाढत असते, मात्र काहीशी थंडी जाणवत असलेल्या काळात राज्यात विजेची मागणी वाढली आहे. रविवार (५ जानेवारी) हा सर्वोच्च वीजमागणी असणारा दिवस ठरला. या दिवशी १६ हजार ५७ मेगावॉटची वीजमागणी नोंदविली गेली. या दिवशी ‘महावितरण’कडून १५ हजार १७१ मेगावॉट विजेचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे पुरवठय़ाच्या दृष्टीनेही हा दिवस विशेष ठरला.
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये विजेच्या मागणीत वाढ होत असताना राज्यातून सुमारे सोळा हजार मेगावॉटपर्यंत विजेची मागणी जाते. हिवाळ्यात किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये मागणीमध्ये घट होत असते. मात्र, मागील काही दिवसांची आकडेवारी लक्षात घेतली, तर हिवाळ्याच्या दिवसातही विजेच्या मागणीमध्ये वाढ झालेली दिसून येते. वाढलेल्या मागणीची पूर्तता होत नसल्याने पूर्वी शहरी भागातही वीजकपात करावी लागत होती. मात्र, सध्या राज्यातील विजेची मागणी व पुरवठय़ातील तूट भरून काढण्यास आम्ही सक्षम असून, पुरेशा प्रमाणात वीजपुरवठा होत असल्याचा दावा ‘महावितरण’कडून करण्यात येत आहे.
रविवारी (५ डिसेंबर) राज्यात सर्वाधिक विजेची मागणी नोंदविली गेली असताना महावितरणकडूनही आतापर्यंतचा सर्वाधिक वीजपुरवठा करण्यात आला. यापूर्वी २९ डिसेंबर २०१३ मध्ये १५ हजार ५६ मेगावॉटचा सर्वोच्च वीजपुरवठा ‘महावितरण’कडून करण्यात आला होता. हा उच्चांक मोडत रविवारी त्याहीपेक्षा अधिक वीजपुरवठा करण्यात आला. मागणी व पुरवठय़ातील तूट ही वीजकपात करून भागविण्यात येते. ज्या भागात विजेची हानी मोठय़ा प्रमाणावर आहे, त्याचप्रमाणे वीजबिलांच्या वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी आहे त्याच भागामध्ये जाणीवपूर्वक वीजकपात केली जात आहे, असे महावितरणकडून सांगण्यात येते.