यावर्षीही पुणेकरांच्या दिवाळीच्या उत्साहाने वातावरणातील प्रदूषणाची पातळी ओलांडली आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वाधिक प्रदूषित हवेची नोंद पुण्यात झाली आहे. गेल्या दोन वर्षांत फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या पातळीतही विशेष बदल झालेला नाही.
शहरात मोठय़ा उत्साहात दिवाळी साजरी झाली. गेल्या तीन वर्षांपासून फटाक्यांचा आवाज कमी झाला असला, तरी लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या दिवशी धूर आणि दूषित हवेने पुणे भरून गेले होते. दिवाळीचे पाचही दिवस पुण्यातील हवेचे प्रदूषण धोकादायक पातळीपर्यंत पोहोचले होते. धनत्रयोदशीपासून पुढील पाचही दिवस पुण्यातील हवेत मोठय़ा प्रमाणावर पार्टीकल मटेरिअल आढळून आले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राज्यात सर्वाधिक प्रदूषित हवा पुण्यात आढळून आली.
हवेत २.५ मायक्रोमीटरपेक्षा लहान पार्टिकल मटेरिअलचे प्रमाण हे प्रत्येक घनमीटरला ६० मायक्रोग्रॅमपेक्षा कमी असणे अपेक्षित असते, तर १० मायक्रो मीटरपेक्षा लहान पार्टिकल मटेरिअलचे प्रमाण हे प्रत्येक घनमीटरला १०० मायक्रोग्रॅमपेक्षा कमी असले पाहिजे. मात्र, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (२३ ऑक्टोबर) हवेत २.५ मायक्रो मीटरपेक्षा लहान पार्टीकल मटेरिअलचे प्रमाण हे  प्रत्येक घनमीटरला १४२  मायक्रोग्रॅमपर्यंत पोहोचले होते. हवेतील १० मायक्रो मीटरपेक्षा लहान पार्टिकल मटेरिअलचे प्रमाण हे प्रत्येक घनमीटरला २११ मायक्रोग्रॅमपर्यंत नोंदवण्यात आले आहे. शहरातील आवाजाच्या फटाक्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून कमी झाले आहे. मात्र, त्याची जागा शोभेच्या फटाक्यांनी घेतली आहे. त्यामुळे हवा प्रदूषणाची पातळी अजूनही धोकादायकच आहे. त्यामुळे कानांना दिलासा मिळाला असला तरी पुणेकरांना फटाक्यांमुळे श्वसनाच्या त्रासाला मात्र सामोरे जावे लागू शकते.
शहरातील आवाजाच्या फटाक्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून कमी झाले असले, तरी गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीनुसार यावर्षीही ध्वनिप्रदूषणाच्या पातळीत खूप फरक पडलेला नाही. यावर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पहाटे ६ ते रात्री १० वाजेपर्यंत कोरेगावपार्क परिसरात आवाजाची सर्वाधिक म्हणजे ८०.९ डेसिबल नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे शिवाजीनगर (७८ डेसिबल), कर्वे रस्ता (७४.७ डेसिबल), सातारा रस्ता (७५.१ डेसिबल), स्वारगेट (७७.६ डेसिबल), शनिवारवाडा (७६.१ डेसिबल), मंडई (७२.२ डेसिबल) आवाज नोंदवण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवाळीच्या दिवशी नोंदवण्यात आलेले हवेतील पार्टिकल मटेरिअल (मायक्रोग्रॅम / घनमीटरमध्ये)

धनत्रयोदशी – (२.५ मायक्रोमीटरपेक्षा लहान – ७०), (१० मायक्रोमीटरपेक्षा लहान – १२१)
नरकचतुर्दशी – (२.५ मायक्रोमीटरपेक्षा लहान – ८२ ), (१० मायक्रोमीटरपेक्षा लहान – १५४ )
लक्ष्मीपूजन – (२.५ मायक्रोमीटरपेक्षा लहान – १४२ ), (१० मायक्रोमीटरपेक्षा लहान – २११)
पाडवा – (२.५ मायक्रोमीटरपेक्षा लहान – १०६ ), (१० मायक्रोमीटरपेक्षा लहान – १६६)
भाऊबीज – (२.५ मायक्रोमीटरपेक्षा लहान – ७०), (१० मायक्रोमीटरपेक्षा लहान – ११२)

(मर्यादा : २.५ मायक्रोमीटरपेक्षा लहान – ६० आणि १० मायक्रोमीटरपेक्षा लहान – १००)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maximum air pollution in diwali
First published on: 29-10-2014 at 03:15 IST