स्मार्ट सिटी अभियानात नागरिकांकडून आलेल्या दीड लाख सूचनांमध्ये सर्वाधिक सूचना वाहतूक सुधारणेबाबत आल्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतुकीचाच प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. यापूर्वी ऑन लाईन पद्धतीने मागवण्यात आलेल्या सूचनांमध्येही नागरिकांनी वाहतूक सुधारणा करण्याबाबतच सर्वाधिक सूचना केल्या होत्या. त्यामुळे शहरातील वाहतूक प्रश्नाबाबत प्रशासनाला ठोस धोरण ठरवून बदल घडवावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्मार्ट सिटी अभियानात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी नागरिकांच्या घरोघरी जाऊन सूचना गोळा केल्या जात आहेत. अभियानात आतापर्यंत दीड लाख सूचना प्राप्त झाल्या असून त्यात वाहतूक सुधारणेबाबतच्या सूचना सर्वाधिक आहेत. शहरातील रस्ते वाहतूक तसेच सार्वजनिक वाहतूक (पीएमपी) याबाबत प्रभावी कृती करण्याची मागणी या सूचनांच्या रुपाने समोर आली आहे. मुळातच हा प्रश्न नागरिकांना का भेडसावत आहे याचाही विचार होणे आवश्यक असून नव्या नियोजनात प्रशासनाला त्याचाही विचार करावा लागणार आहे.
वाहतुकीबाबत नागरिक तक्रारी करत आहेत याचे कारण आणि वाहतूक सुधारणेच्या उपाययोजना या बाबत पीएमपी प्रवासी मंचचे जुगल राठी यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले की, शहरातील वाहतुकीचे नियोजन करताना लोकांचे दळणवळण केंद्रस्थानी न ठेवता वाहनांचे दळणवळण केंद्रस्थानी ठेवले गेल्यामुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेत. शहरातील रस्ते, उड्डाणपूल तसेच अन्य सर्व पर्यायांचा विचार केला तर लक्षात येईल की सर्व नियोजन वाहनकेंद्रित आहे. वाहनांना प्राधान्य दिल्यामुळे पादचारी, सायकलचालक आणि पीएमपीचे प्रवासी हे सर्वाधिक दुर्लक्षित राहिले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष रस्त्यावर नागरिकांना आणि वाहनचालकांनाही अनेकविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहरात मोठा खर्च करून फक्त वाहनांची सोय केली जात आहे. प्रसंगी त्यासाठी बीआरटीचा मार्ग बदलणे, पीएमपीचे थांबे काढून टाकणे, त्यांच्या जागा बदलणे, पदपथ उखडून टाकणे, पादचाऱ्यांची गैरसोय करणे, सायकल ट्रॅक उखडणे असे अनेक प्रकार शहरात होत आहेत. त्यामुळे पादचारी, सायकल चालक आणि पीएमपीचे प्रवासी यांची मोठी गैरसोय झाल्याचे शहरात अनेक ठिकाणी दिसत आहे.
या पुढच्या टप्प्यात आता स्मार्ट सिटी म्हणून आपले शहर विकसित करायचे असेल, तर केवळ काही तात्पुरत्या योजना न आणता वाहतूक सुधारणा कोणता दृष्टिकोन ठेवून करायची या विचाराला प्राधान्य द्यावे लागेल. मेट्रोबाबत शहरात मोठी चर्चा सुरू आहे. मात्र मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवाशांना नेण्या-आणण्यासाठी पीएमपीचे जाळे निर्माण करावे लागेल याचा विचार करावा लागेल. सध्याची पीएमपी ही अधिकारी केंद्रित आणि ठेकेदार केंद्रित आहे. त्यात बदल करून पीएमपी प्रवासीकेंद्रित करावी लागेल. मुख्य म्हणजे वाहतुकीबाबत विस्कळित नियोजन यापुढे चालणार नाही. संपूर्ण शहराचा विचार करून सार्वजनिक वाहतुकीचे नियोजन करणे आता आवश्यक आहे, असेही मत राठी यांनी व्यक्त केले.
शहरातील नागरिकांनी दिलेल्या सूचनांमध्ये वाहतुकीचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे अशा स्वरुपाच्या सूचना सर्वाधिक आहेत. शहरासाठी चांगले व प्रभावी वाहतूक नियोजन करण्याची स्मार्ट सिटी अभियानाच्या निमित्ताने आता संधी आली आहे. या संधीचा उपयोग प्रशासनाने योग्य प्रकारे करून घेतला गेला पाहिजे.
जुगल राठी
अध्यक्ष, पीएमपी प्रवासी मंच