भारती विद्यापीठ भागात दहशत माजवणाऱ्या गुंड टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (माेक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील ३४ गुंड टोळ्यांवर माेक्का कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या कुलकरांच्या WhatsApp चॅटमधून धक्कादायक खुलासे; राफेल विमानांपासून क्षेपणास्त्रांवर चर्चा!

आदित्य उर्फ सोन्या खंडू कांबळे (वय २०, रा. हनुमाननगर, आंबेगाव खुर्द), सोहेल मोदीन आसंगी उर्फ लादेन (वय २२, रा. भोले वस्ती, इंद्रायणीनगर), अमोल तानाजी ढावरे (वय १९, रा. मोडक वस्ती, जांभुळवाडी रस्ता, आंबेगाव खुर्द), अजय विजय पांचाळ (वय २१, रा. नवीन वसाहत, कात्रज) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत. कांबळे आणि साथीदारांनी मद्य विक्री दुकानातील व्यवस्थापकाला धमकावून खंडणीची मागणी केली होती. कांबळे आणि साथीदारांनी गल्ल्यातील दहा हजार रुपयांची रोकड लुटली होती, तसेच दुकानावर दगडफेक करुन दहशत माजविली होती.

हेही वाचा >>> मुंबईतील दोन पर्यटकांचा लोणावळ्यातील खाणीत बुडून मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरमहा हप्ता न दिल्यास जीवे मारु, अशी धमकी दिल्या प्रकरणी कांबळे आणि साथीदारांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. कांबळे टोळीविरुद्ध दरोडा, खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे, तोडफोड, दहशत माजविणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. कांबळे टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी तयार केला होता. अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी नुकतीच मंजुरी दिली. सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर तपास करत आहेत.