पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १३ संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. जुलै २०२५ महिन्यात विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या १३ गंभीर गुन्ह्यांमध्ये एकूण ५७ गुन्हेगारांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

या टोळ्यांनी खून, खुनाचा प्रयत्न, अमली पदार्थविक्री, जबरी चोरी, खंडणी, अपहरण, बलात्कार, घातक शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे, फसवणूक, बनावट कागदपत्रे वापरणे, घरफोडी, दरोडे, वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणे, वाहनांची तोडफोड-जाळपोळ यांसारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर एकूण ११४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अंतर्गत मोकाची कारवाई केली आहे. हिंजवडी, चिंचवड, चिखली, देहूरोड, बावधन, चाकण, सांगवी, दिघी, संत तुकारामनगर, म्हाळुंगे एमआयडीसी, एमआयडीसी भोसरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेल्या १३ टोळीप्रमुख व त्यांचे ५७ साथीदार यांच्यावर ओळख पटवून तपासाअंती ‘मकोका’अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

कारवाई झालेल्या टोळ्या

हिंजवडीतील आशिष ऊर्फ बोना संतोष सोजवळ (टोळीप्रमुख), चिंचवड हद्दीतील परवेज ऊर्फ सोनू जावेद मणियार, बावधन हद्दीतील जयश्री ऊर्फ कल्याणी उमेश देशपांडे, चिखलीतील आकाश पांडुरंग मोहोळ ऊर्फ आक्या बॉण्ड, देहूरोडमधील चंदू गोरख सकट, चाकणमधील विशाल माणिक राऊत, संत तुकारामनगर येथील जावेद साबीरअली सय्यद, दिघीतील शुभम पंढरीनाथ पोखरकर, म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायण सुनील घावटे, सांगवीतील विघ्नेश गुणशिलन रंगम, चिखलीतील अनिरुद्ध ऊर्फ विकी ऊर्फ बाळा राजू जाधव, एमआयडीसी भोसरीतील चेतन रामलाल कुशवाह, शकील खाजा काझी या टोळ्यांवर मकोकाची कारवाई करण्यात आली आहे.