मुंढवा आणि घोरपडी येथील रेल्वे ओलांडणी पुलाबाबत निर्माण झालेले प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने संरक्षणमंत्री ए. के. अॅन्थोनी यांनी बुधवारी (१८ डिसेंबर) दिल्लीत बैठक बोलावली आहे. या पुलांसाठी आवश्यक असलेली संरक्षण खात्याची परवानगी मिळण्याबाबत बैठकीत चर्चा होईल.
उपमहापौर बंडू गायकवाड यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. घोरपडी व मुंढवा येथील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून या ठिकाणी दोन रेल्वे ओलांडणी पूल प्रस्तावित आहेत. गेली सात-आठ वर्षे या पुलांचा विषय चर्चेत असला, तरी त्यासाठीची आवश्यक परवानगी संरक्षण खात्याकडून मिळत नसल्यामुळे ही योजना अद्यापही फक्त चर्चेतच आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी या विषयात संरक्षणमंत्र्यांशी चर्चा केली असून पुलांच्या प्रस्तावाची माहिती देण्यासाठी बुधवारी दिल्लीत बैठक बोलावण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. आमदार रमेश बागवे व उपमहापौर गायकवाड या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
मिरजकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर एक आणि दौंड-सोलापूरकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर एक अशा दोन पुलांचे नियोजन आहे. या दोन्ही मार्गावर दोन रेल्वेफाटके आहेत. संपूर्ण दिवसभरात मिळून ही दारे एकशेसाठ वेळा बंद केली जातात. त्यामुळे वाहनचालकांचा मोठा खोळंबा होतो, तसेच सातत्याने वाहतूक कोंडीही होते. त्यासाठी मिरजकडे जाणाऱ्या मार्गावर ६४८ मीटर लांबीचा व १३ मीटर रुंदीचा पूल बांधण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून, दौंडकडे जाणाऱ्या मार्गावर ७११ मीटर लांबीचा व १३ मीटर रुंदीचा पूल बांधण्याचा आराखडा तयार आहे.
या पुलासाठी रेल्वे आणि पुणे कॅन्टोन्मेंटची परवानगी आवश्यक आहे. या दोन्ही प्रशासनांनी तशी परवानगी दिल्याचे सांगण्यात आले. फक्त संरक्षण खात्याकडून आवश्यक परवानगी मिळत नसल्याने या पुलांच्या कामाबाबत महापालिका तूर्त काही करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. दिल्लीत होणाऱ्या बैठकीत पुलांच्या कामांबाबत सकारात्मक चर्चा अपेक्षित आहे.