पिंपरी -चिंचवड: उद्योगपती रतन टाटा यांनी ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यानंतर त्यांच्या आठवणींना वेगवेगळ्या क्षेत्रातून उजाळा देण्यात येत आहे. पिंपरीतील टाटा मोटर्स मध्ये रतन टाटा यांनी काही वर्षांपूर्वी भेट दिली होती. कामगारांच्या विनंतीनंतर त्यांनी त्यांचा वाढदिवस पिंपरीतील टाटा मोटर्स प्लांटमध्ये साजरा केला होता. यावेळी त्यांनी स्वतः कॅन्टीनमध्ये जेवण करून ताट देखील स्वतः उचलून ठेवलं होतं. या कृतीने आधीच मनावर राज्य करणारे टाटा पुन्हा एकदा कामगारांच्या मनात खोलवर रुजले. या सर्व आठवणी माजी युनियन अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे यांनी लोकसत्ता ऑनलाइनच्या माध्यमातून सांगितल्या आहेत.

हेही वाचा : रतन टाटांच्या इच्छेनुसार यंत्रांची धडधड अखंड सुरूच राहिली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेवाळे म्हणाले, रतन टाटांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर खूप दुःख झालं. मला एक प्रसंग आठवतो. रतन टाटा हे अध्यक्ष पदावरून पायउतार होण्याच्या वेळी त्यांचा वाढदिवस पिंपरी प्लांटमध्ये व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केला. कामगारांसोबत वाढदिवस साजरा करावा, अशी विनंती करण्यात आली. त्या विनंतीवरून रतन टाटा हे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत २५ हजार कामगारांना भेटले. त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. दुपारचे जेवण त्यांनी कामगारांसोबत केले. त्यांनी आम्हाला विचारलं तुम्ही जेवण कुठं करता? आम्ही सांगितलं कॅन्टीन आहे. जेवणही चांगलं आहे. त्यांनी मलाही तुमच्यासोबत जेवायचं आहे, असं सांगितलं. त्यावेळी तुमची व्यवस्था दुसरीकडे केली आहे, असं आम्ही त्यांना सांगितलं. त्यावर ते म्हणाले, तुमच्यासोबतच जेवण करायचं आहे. आम्हाला विश्वास बसत नव्हता. एवढी मोठी व्यक्ती आमच्या सोबत जेवत होती. त्यांनी स्वतः हाताने ताट घेतले. स्वतः वाढून घेतले. जेवण झाल्यानंतर त्यांनी स्वतः ताट उचलले. त्यांचं हे वागणं आम्हाला खूप प्रेरणा देऊन गेलं. आमच्यासाठी ते देव माणूस आहेत, असं विष्णुपंत नेवाळे यांनी सांगितलं.