पुणे : ‘ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांची उत्तम कथा, चांगल्या अभिनयाबरोबरच आणि ना. धों. महानोर यांच्या गीतांचे रसिकांवर गारूड असलेला ‘जैत रे जैत’ चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा आठवडाभरही चालला नाही. चार आठवड्यांसाठी चित्रपटगृह आरक्षित केले होते. पण, जेमतेम सहा दिवसांनंतर हा चित्रपट काढावा लागला होता,’ अशी आठवण या चित्रपटाचे संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी मंगळवारी सांगितली. ‘चार तपांनंतर या चित्रपटाची आठवण काढली जाते. पण, आता अशा स्वरूपाचा चित्रपट आला, तर त्याला यश मिळेल का?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
‘जैत रे जैत’च्या ४८ व्या वर्षाचे औचित्य साधून महक संस्थेच्या वतीने पुण्यात आयोजित एका कार्यक्रमानिमित्त या चित्रपटाचे संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, निर्मात्या उषा मंगेशकर, अभिनेते डाॅ. मोहन आगाशे आणि पटकथा लेखक सतीश आळेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मंगेशकर बोलत होते. या कार्यक्रमामध्ये गोनीदांची नात आणि प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी ‘जैत रे जैत’ या कादंबरीच्या काही भागाचे अभिवाचन केले. चित्रपटाच्या मूळ संचातील पार्श्वगायक रवींद्र साठे यांच्यासह विभावरी आपटे-जोशी आणि मनीषा निश्चल यांनी या चित्रपटातील गीते सादर केली.
‘‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ हे गीत सर्वांत लोकप्रिय झाले असले, तरी संगीतकार म्हणून मला ‘नभ उतरू आलं’ हे गीत आवडते. ‘नभ नतरू आलं’ यामध्ये विलक्षण काव्य लपले आहे. यातील ‘झिम्माड’ शब्दांतही अर्थ असून, देहातीत होणे म्हणजे झिम्माड होणे, असे सांगतानाच मंगेशकर यांनी या चित्रपटातील अनेक कलाकार आपल्यामध्ये नाहीत याची खंत वाटते,’ असे नमूद केले. प्रेक्षकांची नाराजी दूर करण्यासाठी ‘‘पीक करपलं, पक्षी दूर देशी गेलं’ हे गीत चित्रपटातून कापावे लागले, याचा मला खेद वाटतो,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
संगीत हेच या चित्रपटाचे बलस्थान आहे. लोकप्रिय आणि कलात्मकता याचे मिश्रण असलेल्या ‘जैत रे जैत’मध्ये परंपरा आणि नवतेचा संगम साधला गेला असल्याचे आळेकर यांनी सांगितले.
‘‘जैत रे जैत’चे गारूड आजही आहे. यातील नाग्या ही माझी व्यक्तिरेखा मनाने सरळ किंवा भाबडा म्हणू अशी आहे. गोनीदांना उलगडलेले हे पात्र डाॅ. जब्बार पटेल यांनी सांगितले, तसे मी पडद्यावर साकारले. याउलट, मनाला पटते तसे वागणारी चिंधी म्हणजे पडद्यावर भूमिका साकारणारी स्मिता पाटील ही मनस्वी आहे. अमराठी भाषकांनाही हा चित्रपट आवडला,’ असे आगाशे यांनी सांगितले.