भक्ती बिसुरे, लोकसत्ता

पुणे : करोना महामारीने गेल्या दोन वर्षांत संपूर्ण जगासमोर जगण्याचे प्रश्न उभे केले. करोनाकाळातील भीती, असुरक्षितता, अस्थैर्य, रोजगाराचे प्रश्न, घरात कोंडून पडण्याचे संकट यामुळे मानसिक आरोग्याच्या कित्येक प्रश्नांना त्या काळात निमंत्रण मिळाले. आता करोनाचे संकट टळल्यावर जगणे पूर्वपदावर येताना मात्र नव्या रूपाने हे प्रश्न माणसांना त्रास देत असल्याचे दिसून येत आहे. करोनापूर्व जगण्याकडे परतणे अनेकांना आव्हानात्मक ठरत असल्यामुळे मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशकांची मदत घेण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी (१० ऑक्टोबर) जागतिक मानसिक आरोग्य जनजागृती दिवस साजरा करण्यात आहे. ‘मानसिक आरोग्य हे जागतिक स्तरावरील प्राधान्य हवे’ या मध्यवर्ती संकल्पनेवर यंदा हा दिवस साजरा करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत मानसिक आरोग्य हा ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्याचा अत्यंत कळीचा प्रश्न ठरत आहे. जगण्यातील वाढते ताणतणाव, कामाच्या ठिकाणी असलेली स्पर्धा, भीती, नैराश्य अशा अनेक कारणांनी मानसिक आरोग्याचे प्रश्न वाढत आहेत. मात्र, करोनाकाळात त्यांचे गांभीर्य आणखी वाढले आहे. करोनाकाळात जवळची माणसे गमावलेल्यांमध्ये दिसणारे मानसिक आरोग्याचे प्रश्नही गुंतागुंतीचे आहोत.  मानसोपचारतज्ज्ञ डॉ. निकेत कासार म्हणाले, शहरी भागातील ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात जाणे, त्यासाठी दररोज दोन ते तीन तास प्रवास करणे या गोष्टी असह्य होत आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत बसणे, अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे जड जात आहे, त्यातून शिक्षक मुलांना समुपदेशकांकडे पाठवत आहेत. थोडक्यात, करोनापूर्व काळातील जगण्याकडे परत जाणे नागरिकांसाठी आव्हानात्मक ठरत असल्याचे निरीक्षण डॉ. कासार बोलून दाखवतात. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमोल देशमुख सांगतात, लहान मुलांना लागलेली ऑनलाइन शाळेची सवय पुन्हा ऑफलाइन शाळेत बदलणे पालकांसाठीही आव्हान होते. त्या पालकांना हे वर्ष मुलांना शाळेत जाण्याची सवय पुन्हा लावण्यासाठी द्या, हे समजावण्याची गरज भासली. ऑनलाइन कामाला सरावलेल्या कर्मचाऱ्यांनाही रोज ठरावीक वेळेत कार्यालयात जाणे, ‘टार्गेट’ पूर्ण करणे, वरिष्ठांना दैनंदिन अहवाल देणे हे त्रासदायक वाटल्याने मानसोपचारतज्ज्ञांकडे मदतीसाठी येणारे नागरिक आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mental health problems increase after covid 19 pandemic zws
First published on: 10-10-2022 at 02:03 IST