पुणे : संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार आणि साहित्यसम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या नावाने पुण्यात गेल्या ५६ वर्षांपासून कार्यरत आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान या संस्थेचे गेल्या पावणेदोनशे वर्षांपासून वाचनसंस्कृती प्रसाराचे कार्य करणाऱ्या पुणे नगर वाचन मंदिर या संस्थेमध्ये विलीनीकरण होत आहे. आचार्य अत्रे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून बुधवारी (१३ ऑगस्ट) या विलीनीकरणाची औपचारिक घोषणा होणार आहे.
‘आचार्य अत्रे यांचे पुणे नगर वाचन मंदिरावर प्रेम होते. येथील पुस्तकांचे वाचन केल्यामुळेच माझे व्यक्तिमत्त्व चतुरस्त्र झाले, अशी कृतज्ञता अत्रे यांनी अनेकदा व्यक्त केली आहे. याचा त्यांच्या आत्मचरित्रामध्येही उल्लेख आहे. अत्रे साहेबांचे प्रेम असलेल्या संस्थेमध्ये आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान विलीन करण्याचा निर्णय घेताना मनस्वी आनंद झाला आहे,’ अशी भावना प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष बाबुराव कानडे यांनी व्यक्त केली.
‘पुणे नगर वाचन मंदिरात भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांच्या तैलचित्राचे अनावरण आचार्य अत्रे यांच्या हस्ते झाले होते. तर, आचार्य अत्रे यांच्या तैलचित्राचे अनावरण महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ साहित्यिक अनंत काणेकर यांच्या हस्ते झाले होते,’ अशा आठवणींना कानडे यांनी उजाळा दिला.
माझे वय आता ९० वर्षे आहे. वयोमानानुसार आता दगदग सहन होत नाही. त्यामुळे संस्था अत्रे साहेबांच्या प्रेमाच्या संस्थेमध्ये विलीन करताना माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. – बाबुराव कानडे, संस्थापक-अध्यक्ष, आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान
सहा महिन्यांपूर्वी बाबुराव कानडे यांचा दूरध्वनी आला होता. आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानचे काम पुढे नेण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा झाली असता संस्थेमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्याला त्यांनी आनंदाने मान्यता दिल्याने ही प्रक्रिया सुलभ झाली. यावर्षी दोन्ही संस्थांच्या वतीने अत्रे जयंतीचा कार्यक्रम होणार आहे. – मधुमिलिंद मेहेंदळे, अध्यक्ष, पुणे नगर वाचन मंदिर
मंगला गोडबोले यांचे व्याख्यान
आचार्य अत्रे यांच्या ‘झेंडूची फुले’ या कवितासंग्रहाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. हे औचित्य साधून पुणे नगर वाचन मंदिर आणि आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी (१३ ऑगस्ट) ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांचे या कवितासंग्रहावर व्याख्यान होणार आहे. भारतीय विचार साधना सभागृह येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात मृणालिनी नानिवडेकर (पत्रकार), संदेश कुलकर्णी (नाटककार) आणि शिवराज वायचळ (दिग्दर्शक) यांना आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.