scorecardresearch

पिंपरी पालिका निवडणुकीतील मतदार याद्यांमध्ये घोळ ; दीड ते अडीच हजार नावे मूळ प्रभागांकडून दुसरीकडे ; खासदार श्रीरंग बारणे यांची तक्रार

राज्य निवडणूक आयोगाला विनंती करून आणखी १५ दिवसांची मुदतवाढ मिळवून घ्यावी, अशी सूचना बारणे यांनी आयुक्तांना केली आहे.

shirang-barne
शिवसेना खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी: आगामी महापालिका निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये उघडपणे राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप भाजप आमदार उमा खापरे यांनी केला असतानाच, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही मतदार याद्यांमधील घोळ समोर आणले आहेत. प्रत्येक प्रभागातील दीड ते अडीच हजार नावे मूळ प्रभागांमध्ये नसून दुसरीकडे जोडली गेली आहेत, याकडे बारणे यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांचे लक्ष वेधले आहे.

पालिका निवडणुकीसाठी केलेली प्रभागरचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनुकूल झाली असल्याची ओरड सुरूवातीपासून होत आहे. त्यातच मतदार याद्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याची आणि अधिकाऱ्यांनी पक्षपातीपणे कारभार केल्याची तक्रार भाजपकडून आमदार खापरे यांनी आयुक्तांकडे केली आहे. त्यापाठोपाठ, खासदार बारणे यांनी आयुक्तांना एक पत्र पाठवून मतदार याद्यांमधील चुका लक्षात आणून दिल्या आहेत. निवडणुकीसाठी प्रभागानुसार फोडण्यात आलेल्या मतदार याद्यांची विभागणी प्रभाग रचनेला अनुसरून झालेली नाही. एकीकडील नावे दुसऱ्या प्रभागांमध्ये समाविष्ट झालेली आहेत. जवळपास सर्वच प्रभागांमधील दीड ते अडीच हजार नावे मूळ प्रभागांमध्ये नाहीत, ती नावे दुसऱ्या प्रभागांमध्ये जोडण्यात आल्याचे दिसून येत आहेत, असे बारणे यांनी म्हटले आहे. तसेच, मतदार यादीतील नावे शोधण्यासाठी दिलेला अवधी खूपच कमी आहे. निवडणूक शाखेने २३ जूनला प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी १ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या ९ जुलैला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मतदार याद्यांवर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी देण्यात आलेला ८ दिवसांचा कालावधी खूप कमी आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला विनंती करून आणखी १५ दिवसांची मुदतवाढ मिळवून घ्यावी, अशी सूचना बारणे यांनी आयुक्तांना केली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mess in voter lists in pimpri municipal elections says mp shrirang barne zws