पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी परिसरात मेट्रोचे काम सुरू असताना महापालिकेच्या पंपिंग झोनला पाणीपुरवठा करणाऱ्या १२०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला अचानक धक्का लागून पाणीगळती सुरू झाली. दुरुस्तीचे काम हाती घेतले असून आज गुरुवारी (२५ सप्टेंबर) दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

ही गळती रोखण्याचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून युद्धपातळीवर करण्यात येत आहे. गळती रोखण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. हे काम तातडीने पूर्ण करून शुक्रवारी (२६ सप्टेंबर) सकाळपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा पाणीपुरवठा विभागाचा प्रयत्न आहे. या कामामुळे चिखली, तळवडे, नेहरूनगर, संत तुकारामनगर, महेशनगर, कुदळवाडी, शाहूनगर, अजंठानगर, म्हेत्रेवस्ती, त्रिवेणीनगर, जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी आदी भागांतील पाणीपुरवठा गुरुवारी (२५ सप्टेंबर) दिवसभर बंद राहणार आहे. नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून पाणीपुरवठा लवकरात लवकर नियमित करण्यासाठी पाणीपुरवठा विभाग प्रयत्नशील असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पवना नदीवर रावेत बंधाऱ्यावरुन पाणी उचलून जलवाहिनीद्वारे निगडीत आणले जाते. तेथे जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया केली जाते. पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना वितरित केले जाते.

आंद्रा धरणातील ८० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी उचलले जाते. हे पाणी धरणातून इंद्रायणी नदीत सोडले जाते. नदीवरील निघोजे बंधाऱ्यातून महापालिका अशुद्ध पाणी उचलते. तेथून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाते. तिथे पाण्यावर प्रक्रिया करुन जलवाहिनीद्वारे जलकुंभात (टाक्या) पाणी सोडले जाते. शहराला दररोज ६५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणातून ५५० दशलक्ष लीटर,आंद्रा धरणातून ८० दशलक्ष लीटर आणि एमआयडीसीकडून २० दशलक्ष लीटर पाणी उचलले जाते.

मागील सहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा

वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पाणी नसल्याचे आणि पाणीपुरवठा सुरळित करण्याचे कारण देऊन महापालिका प्रशासनाकडून सहा वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. धरणे भरली असतानाही दिवसाआडच पाणीपुरवठा सुरु आहे. दररोज पाणीपुरवठा सुरु करण्याची नागरिकांची मागणी आहे. वाढीव पाणी उपलब्ध झाल्याशिवाय दररोज पाणीपुरवठा केला जाणार नसल्यावर महापालिका प्रशासन ठाम आहे.