पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी ‘हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन’ने मेट्रोझिप ही खासगी बससेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बस उपलब्ध होणार असून त्यामुळे छोट्या खासगी वाहनांची संख्या कमी होऊ शकेल.

इंडस्ट्रीज असोसिएशनने २०१४मध्ये मेट्रोझिप ही बससेवा सुरू केली होती. यात अनेक खासगी कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या माध्यमातून ११३ बसमधून दररोज सुमारे ६ हजार कर्मचारी प्रवास करीत होते. त्यामुळे आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांची खासगी वाहने कमी संख्येने रस्त्यावर येऊन वाहतूक कोंडी टळत होती. करोनाकाळात बहुसंख्य आयटी कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची मुभा दिली गेल्याने मार्च २०२० पासून ही सेवा बंद पडली होती. मात्र आता बहुतांश कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कार्यालयात येणे बंधनकारक केले आहे.

मात्र बसची सोय नसल्याने खासगी वाहनांचा वापर वाढला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याने हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने पुन्हा ‘मेट्रोझिप’ बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) विनंती करण्यात आली असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे. येत्या महिनाभरात ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

‘मेट्रोझिप’मुळे वाहनांची संख्या कमी होऊन वाहतूक कोंडीची समस्याही कमी झाली होती. आता पुन्हा ही बससेवा सुरू होणार आहे. त्यासाठी कोकोराइड्स या कंपनीशी करारही करण्यात आला आहे. – शंकर सालकर, वाहतूक सेवाप्रमुख, हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खासगी वाहनांचा वापर कमी होणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांसाठी बससेवा सुरू केल्यास ही समस्या काही प्रमाणात कमी होईल. नियमानुसार या सेवेला परवानगी दिली जाईल. – संदेश चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

औद्याोगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी पीएमपीएमएलने बससेवा सुरू केली आहे. त्याबरोबरच कर्मचाऱ्यांसाठी खासगी बससेवा सुरू होत असेल, तर ही चांगली बाब आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. – नितीन वानखेडे, मुख्य अभियंता, एमआयडीसी.