पुणे : अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘एमएचटी-सीईटी’चा निकाल राज्य समायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी) साेमवारी जाहीर केला. त्यात पुण्यातील चार विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेंटाइल मिळवण्याची कामगिरी केली असून, या चौघांनीही आयआयटीमध्ये अभियांत्रिकी पदवी प्रवेशाच्या दृष्टीने आठवीपासूनच तयारी सुरू केली होती.
‘सीईटी सेल’ने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) या गटाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. राज्यातील ४ लाख ६४ हजार २६३ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यांपैकी ४ लाख २२ हजार ६६३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. निकालात राज्यभरातील एकूण २२ विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेंटाइल मिळवले. त्यात पुण्यातील तनय गाडगीळ, ध्रुव नातू, अनुज पगार आणि सिद्धान्त पाटणकर या चौघांनी १०० पर्सेंटाइल मिळवले आहेत. त्यांपैकी तनय, ध्रुव आणि अनुज यांनी आठवीपासूनच अभियांत्रिकी प्रवेशाच्या दृष्टीने तयारी सुरू केली होती.
तनय म्हणाला, ‘आठवीपासून विज्ञान आणि गणिताची शिकवणी लावली होती. तर, अकरावीला ‘जेईई’च्या दृष्टीने तयारी सुरू केली. गेली दोन वर्षे सातत्याने सुमारे आठ तास अभ्यास करीत होतो. एमएचटी-सीईटीला चांगले गुण मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, १०० पर्सेंटाइल मिळतील, असे वाटले नव्हते. ‘जेईई ॲडव्हान्स’ला अखिल भारतीय स्तरावर १५४३वा क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे ‘आयआयटी मुंबई’ला रसायन अभियांत्रिकीला प्रवेश घेण्याची तयारी करीत आहे. माझे आई-वडील शास्त्रज्ञ आहेत. मात्र, अभियांत्रिकी पदवीनंतर नोकरी करायची, की संशोधन क्षेत्रात काम करायचे याचा विचार अद्याप केला नाही.’
‘जेईई’ची तयारी आठवीपासूनच सुरू केली होती. त्यासाठी खासगी शिकवणी लावली होती. ‘जेईई’ मुख्य परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर २७७वा, तर ॲडव्हान्समध्ये ३०७वा क्रमांक मिळाला आहे. आयआयटी मुंबईला इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीला प्रवेश घेणार आहे. अभियांत्रिकी प्रवेशाच्या दृष्टीने गेली दोन वर्षे सुमारे दहा तास अभ्यास करीत होतो. पदवी पूर्ण करून संशोधनात करिअर करण्याचा मानस आहे, असे अनुज पगारने सांगितले. अनुजचे वडील खासगी कंपनीत नोकरी करतात, तर आई शिक्षिका आहे.
ध्रुव नातूनेही आठवीपासूनच जेईईसाठी खासगी शिकवणी लावली होती. त्याचे अभियंता असलेले वडील बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहेत. अभ्यास, परीक्षेच्याबाबत तो म्हणाला, ‘जेईईच्या दृष्टीने अभ्यास करत राहिलो. मात्र, सीईटीमध्ये १०० पर्सेंटाइल मिळतील असे वाटले नव्हते. जेईई ॲडव्हान्स्डला अखिल भारतीय स्तरावर २९३वा क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे आता आयआयटी मुंबईमध्ये इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीला प्रवेश घेणार आहे.’
सिद्धान्त पाटणकरनेही आठवीपासूनच खासगी शिकवणी लावून अभियांत्रिकी प्रवेशाची तयारी सुरू केली. त्याला जेईई ॲडव्हान्स्डमध्ये अखिल भारतीय स्तरावर ७९०वा क्रमांक मिळाला आहे. आता तो आयआयटी मुंबईमध्ये इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीला प्रवेश घेणार आहे. त्याचे वडील अभियंता, तर आई शास्त्रीय गायिका आहे. ‘सीईटी’तील कामगिरीबाबत तो म्हणाला, ‘सातत्यपूर्ण अभ्यास महत्त्वाचा आहे. मी सुमारे आठ ते दहा तास नियमित अभ्यास करीत होतो. त्यामुळे शंभर पर्सेंटाइल मिळू शकतात, असे वाटले होते. पुढे जाऊन नोकरीच्याच दृष्टीने विचार करत आहे.’