पुणे : ‘सर्वसामान्य महिलांकडे कर्जासाठी तारण नसते. मग बाजारातून चक्रवाढ व्याजाने पैसे उसने घ्यावे लागतात. तारणाशिवाय कर्ज नाही, हा अर्थशास्त्रात अगदी मूलभूत नियम आहे. मात्र, गेल्या तीस चाळीस वर्षांत सूक्ष्म वित्ताची मोठी क्रांती झाली. अन्नपूर्णा परिवार हा त्याचेच उदाहरण आहे. संस्थेने लाखो महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले. त्यांना स्वयंपूर्ण केले. ‘अन्नपूर्णा’ म्हणजे शांतपणे झालेली आर्थिक क्रांतीच आहे,’ असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांनी रविवारी व्यक्त केले.
अन्नपूर्णा परिवार आणि समकालीन प्रकाशनच्या वतीने आयोजित मेधा पुरव-सामंतलिखित ‘आम्ही स्वयंपूर्णा’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात डॉ. रानडे बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, अभिनेत्री चिन्मयी सुमित, समकालीन प्रकाशनच्या गौरी कानिटकर या वेळी उपस्थित होत्या.
रानडे म्हणाले, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे नोकरी मिळवणे अवघड झाले आहे. बदलत्या काळात स्वतःच्या पायावर उभे राहणे कठीण होत आहे. सध्याची आव्हाने लक्षात घेता स्वयंनिर्मिती, स्वयंरोजगार आणि स्वयंपूर्ण होण्याची गरज निर्माण झाली आहे. सरकारी अनुदानाशिवाय महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी अन्नपूर्णा परिवाराने केलेले काम हे आदर्श आहे.’
‘लाडक्या बहिणींना केवळ आधार कार्डवर पैसे वाटण्यात आले. त्यात सुमारे २६ लाख बोगस महिला आणि सुमारे १४ हजार पुरुषांनीही पैसे घेतल्याचे समोर आले आहे. देशातील अनेक राज्यांत अशा प्रकारे लाडक्यांना पैसे वाटण्याची परंपरा निर्माण होते आहे. त्याने देशाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे,’ अशी टीका केतकर यांनी केली.
महिलांचा सहभाग वाढवण्याचे आव्हान
‘देश प्रगती करत आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) वाढ होते आहे. मात्र, अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांत ‘वर्क स्पेस’मधील महिलांचा सहभाग सातत्याने कमी होत आहे. सध्या सौदी अरेबियापेक्षाही आपल्या देशातील महिलांचे ‘वर्क स्पेस’मधील प्रमाण कमी आहे. ‘वर्क स्पेस’मध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याचे मोठे आव्हान आहे,’ असे डॉ. रानडे यांनी सांगितले.