पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेचे कार्यालय राज्य मंडळात तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित करण्यात आले असून, नव्या इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत परीक्षा परिषद राज्य मंडळातून चालवली जाणार आहे.
पुण्यातील डॉ. आंबेडकर रस्ता येथील लाल देवळासमोर राज्य परीक्षा परिषदेचे कार्यालय आहे. परीक्षा परिषदेतर्फे विभागीय परीक्षा, व्यावसायिक परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा आदींचे आयोजन केले जाते. परीक्षा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षा परिषदेचे प्रशासकीय कार्यालय शिवाजीगर येथील आगरकर रस्ता येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. राज्य मंडळात असलेल्या कार्यालयातून परीक्षा परिषदेचे नियमित कामकाज सुरू राहील, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली.