पुणे : राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत संस्थांतर्गत कोट्यातील प्रवेशांसाठीच्या बदललेल्या नियमाला संस्थाचालकांनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर, ‘संस्थाचालकांचे म्हणणे ऐकून घेऊ, काही बदल आवश्यक असल्यास ते केले जातील,’ असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले.
शिक्षण विभागाने यंदा राज्यभर राबवल्या जाणाऱ्या अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत इनहाउस कोट्याबाबत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. त्यानुसार कनिष्ठ महाविद्यालय शाळेच्या संकुलात असेल, तरच मुले इनहाउस कोट्यासाठी पात्र ठरणार आहेत. मात्र, या निर्णयाला संस्थाचालकांनी विरोध केला आहे. त्याबाबत भुसे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांचे हित पाहून इनहाउस कोटा ठेवण्यात आला आहे. याबाबत संस्थाचालकांचे काही म्हणणे असल्यास ते ऐकून घेतले जाईल. बदल कोणालाही त्रास देण्यासाठी केलेले नाहीत. काही बदल आवश्यक असल्यास ते केले जातील.
‘इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची ऑनलाइन कार्यपद्धती काही तांत्रिक कारणामुळे थांबली होती. मात्र, तांत्रिक दोष दूर करण्यात आले आहेत. सोमवारपासून ऑनलाइन कार्यपद्धती सुरळीतपणे सुरू होईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेली महाविद्यालये गुणवत्तेनुसार उपलब्ध होतील. चांगले गुण असूनही चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता. आता ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे ती संधी मिळणार आहे. पालकांची आर्थिक बचत होणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती अशा ठिकाणी ऑनलाइन प्रवेश कार्यपद्धती अस्तित्त्वात होती. आता त्याची राज्यभर अंमलबजावणी केली जाणार आहे. ऑनलाइन कार्यपद्धतीचे फायदे काय आहेत, ते नक्कीच सांगितले जातील. अभ्यासपूर्ण पद्धतीने हा निर्णय घेण्यात आला आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.
शिष्यवृत्ती परीक्षांबाबत तज्ज्ञ समितीशिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी आणि सातवीत घेण्याबाबत अभ्यास सुरू आहे. त्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय अजून झालेला नाही, असेही दादा भुसे यांनी सांगितले.