इंदापूर : एके काळी शड्डू ठोकून तालमीत एकमेकांसमोर उभे राहणारे, काही काळ एका खोलीत राहणारे दोन मित्र… कालांतराने दोघांच्या वेगळ्या झालेल्या वाटा… पुढे एकजण कुस्तीमध्ये यशस्वी होत महाराष्ट्र कामगार केसरी झाला, तर दुसरा राजकारणात सक्रिय होऊन केंद्रीय राज्यमंत्री झाला… अनेक वर्षांनी एकमेकांसमोर आल्यावर या दोन मित्रांनी घट्ट मिठी मारत मातीत जुळलेल्या मैत्रीला पुन्हा एकदा उजाळा दिला.
दौऱ्यावर असलेले केंद्रीय सहकार आणि हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माजी महाराष्ट्र कामगार केसरी, ज्येष्ठ कुस्तीपटू हिराचंद (पिंटू) काळे यांची इंदापूर येथील राहत्या घरी गुरुवारी सदिच्छा भेट घेतली. १९९० च्या दशकात कोल्हापुरातील शाहूपुरी तालीम येथे दोघेही कुस्तीचा सराव करत होते. त्यावेळी त्यांची मैत्री झाली होती. त्यावेळचा स्नेह आजही कायम असल्याचे या भेटीतून दिसून आले. प्रवीण माने या भेटीवेळी उपस्थित होते.
अनेक वर्षांनी झालेल्या या भेटीमुळे मोहोळ आणि काळे दोघेही अत्यंत आनंदात होते. या भेटीदरम्यान दोघांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. कोल्हापुरातील, कुस्तीच्या तालमीतील अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यावेळच्या आठवणी, घटना, किश्श्यांमध्ये दोघेही मनमुराद रमून गेले होते. मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळतानाच या भेटीवेळी मात्र मोहोळ यांनी मंत्रिपदाची झूल बाजूला ठेवून जुन्या मित्राला वेळ देत मैत्रीच्या नात्याला अधिक महत्त्व दिले. काही काळापूर्वी मोहोळ यांनी मंत्रिपद स्वीकारल्यानंतर दौऱ्यावर असताना आता पोलीस खात्यात कार्यरत असलेला मित्र त्यांना अचानक भेटला होता. त्या भेटीची चित्रफीत समाज माध्यमात चर्चेत होती. जणू त्या भेटीचीच पुनरावृत्ती मोहोळ, काळे यांच्या भेटीदरम्यान झाल्याचे दिसून आले.