पिंपरी-चिंचवड महापालिकेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी चिखलीत उभारलेल्या घरकुलामधील एका लाभार्थ्यांने सदनिकेची विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. ३६ सदनिकांमध्ये भाडेकरू, तर १२ सदनिकांमध्ये नातेवाईक वास्तव्यास असल्याचे आढळून आले. संबंधितांना नोटीस पाठविण्यात आली आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने महापालिकेच्या वतीने सेक्टर क्रमांक १७ व १९ चिखली येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल प्रकल्प राबविण्यात आला आहे. घरकुल प्रकल्पात सहा हजार ९० सदनिका आहेत. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना दहा वर्षापर्यंत सदनिका भाड्याने, विक्री करणे अथवा नातेवाईकास, मित्रास, परिचितास पोट भाड्याने देणे अथवा दान, तारण ठेवता येत नाही. अशा प्रकारचा करारनामा लाभार्थ्यांबरोबर झाला आहे. करारनाम्याचे उल्लंघन झाल्यास सदनिकेचा ताबा रद्द करण्याची तरतूद आहे.
हेही वाचा >>> पुणे : वाढत्या महागाईच एक कारण म्हणजे भ्रष्टाचार : किरीट सोमय्या
अनेकांनी सदनिका भाड्याने दिल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार गतवर्षी झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने सर्वेक्षण केले होते. यामध्ये दोघांनी सदनिकेची विक्री केल्याचे समोर आले होते. याच पार्श्वभूमीवर २४ मार्च रोजी पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये पाच हजार ३७ लाभार्थी स्वतः सदनिकांचा वापर करत आहेत. ९६९ सदनिकाधारक कामावर गेल्याने बंद होत्या. ३६ कायम बंद, ३५ सदनिकांमध्ये भाडेकरू, १२ सदनिकांमध्ये नातेवाईक वास्तव्यास, तर एका सदनिकेची व्रिकीच केल्याचे उघड झाले.
चिखली घरकुलमधील सदनिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. सदनिका विक्री, भाड्याने देणाऱ्यांना नोटीस देऊन खुलासा मागविण्यात येणार आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.सुषमा शिंदे, सहायक आयुक्त, झोनिपु विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका