पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) प्रवाशांच्या सोयीसाठी ऑनलाईन ॲप, तिकीट काढण्यासाठी क्यू आर कोड, ट्रॅकिंग सिस्टीम, कार्यालयीन कामकाजाचे संकेतस्थळ आदी साॅफ्टवअरच्या पासवर्ड आधारे माहितीचा गैरवापर झाला असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे करार पद्धतीनुसार पीएमपीने मानधन तत्वावर खासगी नेमलेल्या दोन विपणन प्रतिनिधींकडून (मार्केटींग एक्झिक्युटीव्ह) हा प्रकार घडवून आणण्यात आला आहे.
प्रशासकीय पातळीवरील गोपनिय माहिती आणि प्रवाशांच्या खासगी माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन पीएमपी प्रशासनाने नेमलेल्या व्यक्तींसोबतचा करार रद्द करून दोन्ही व्यक्तींवर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून पत्रकाद्वारे देण्यात आली.
सार्वजनिक व्यवस्थेतील ‘पीएमपी’ प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रवाशांना ऑनलाईन सेवा देऊ केली आहे. त्यानुसार क्यू-आरकोड द्वारे शुल्क आकारणी, आपली पीएमपीएमएल हे ऑनलाईन ॲप, तसेच पीएमपी ट्रॅकिंग सिस्टीम आदी सेवांबरोबरच पीएमपीचे स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. ज्या प्रवाशांकडून या सेवांचा वापर केला जातो त्यापूर्वी प्रवाशांनी वैयक्तीक माहिती भरून या सेवांचा अवलंब करण्यासाठी सांगितले जाते. तसेच प्रवाशांनी केलेल्या शुल्काची ऑनलाईन आकारणी माहिती आणि प्रशासकीय कागदपत्रांचा विदा ऑनलाईन साॅफ्टवेअरद्वारे संकणकीकृत करण्यात आला आहे.
प्रवाशा्ंना या तांत्रिक प्रणालीमुळे सुलभ सेवा मिळत आहे. मात्र, या संपूर्ण ऑनलाईन साॅफ्टवेअर प्रणाली हाताळण्यासाठी आणि भविष्यात विकसीत करण्यासाठी पीएमपीने खासगी दोन विपणन प्रतिनिधींची करार पद्धतीवर नियुक्ती केली. मात्र, दिवसेंदिवस महसुलात घट होत असून साॅफ्टवेअरमध्येही तांत्रिक बिघाड असल्याचे समोर आले. याबाबत तपासणी केली असता, संबंधित दोन कंत्राटी व्यक्तींकडून साॅफ्टवेअर विकसीतच केले नसून त्यांना याचा अनुभवही नसल्याचे समोर आले. तसेच पीएमपीच्या साॅफ्टवअरचे पासवर्ड वापरून अधिकृत संकेतस्थळावरून बेकायदेशीर मेलचा वापर केला असल्याचेही निष्पंन्न झाले.
त्यामुळेच पीएमपीच्या उत्पन्नात घट असल्याचे स्पष्ट होत असून भविष्यात पीएमपीच्या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता करून फसवणूक केल्याबद्दल आणि पीएमपीची प्रतिमा मलीन केल्याबद्दल दोन व्यक्तींची करारी पद्धतीने नेमणूक रद्द करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे या्ंनी दिली.
लॅपटाॅप, टॅब उपकरणेही देण्यास टाळाटाळ
दोन्ही कंत्राटी विपणन प्रतिनिधींना पीएमपीकडून लॅपटॉप, टॅब, संगणक आणि इतर तांत्रिक उपकरणे देण्यात आले आहेत. या वस्तू तातडीने पीएमपी प्रशासनाकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या वस्तुही पुन्हा जमा करण्यात आल्या नसल्याची माहितीही पीएमपी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
पीएमपीने या प्रकाराची गंभीर दखल घेत सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात संबंधित माहितीचा गैरवापर होऊ नये, सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित दोन व्यक्तींवर स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीएमपीच्या प्रवासी सेवेवर कुठलाही परिणाम होणार नाही. – पंकज देवरे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल.
