पुणे : एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेला प्रतिष्ठित ‘नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज’कडून (एनएबीएल) अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे. या मान्यतेमुळे विद्यापीठाला औद्योगिक सल्लागार सेवा, सामूहिक संशोधन प्रकल्प आणि नवीन तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारीसाठी व्यापक संधी मिळणार आहेत.
एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान प्रशालेअंतर्गत असलेल्या पाच अत्याधुनिक प्रयोगशाळांद्वारे एकूण ५१ प्रकारच्या चाचण्या घेतल्या जातात. या चाचण्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मान्यताप्राप्त निकषांवर आधारित आहेत. या चाचणींसाठी जागतिक स्तरावरील चाचणी यंत्रणा, विविध उपकरणे (रॉकवेल, विकर्स, ब्रिनेल, मायक्रो-विकर्स), ॲक्सियल कम्प्युटरायझ्ड फॅटिग टेस्टिंग मशिन, कम्प्रेशन टेस्टिंग मशिन आणि उच्च-प्रेसिजन मायक्रोस्कोप (आरव्ही ३) यांचा वापर केला जातो. या सर्व उपकरणांचा वापर चार मेकॅनिकल अभियांत्रिकी आणि एका स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या प्रयोगशाळांमध्ये केला जातो. एनएबीएल मान्यता मिळवण्यासाठी प्रयोगशाळेने चाचणी प्रक्रियेतील अचूकता, उपकरणांची परिपूर्ण कॅलिब्रेशन आणि आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता या सर्व निकषांची पूर्तता केली.
प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. संदीप चव्हाण म्हणाले, ‘सुसंगत नियोजन, मेहनतीमुळेच एनएबीएल प्रमाणन प्रक्रिया यशस्वी होऊ शकली. विद्यापीठाने नेहमीच शैक्षणिक गुणवत्ता, वैज्ञानिक प्रामाणिकता आणि उद्योगांशी सशक्त सहकार्याला प्राधान्य दिले आहे. एनएबीएल मान्यतेमुळे विद्यार्थी संशोधकांना जागतिक मानकांनुसार संशोधनाची संधी मिळेल.’