पिंपरी-चिंचवड शहरात सोसायट्यांना कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरेशा पाण्याचा तुटवडा भासत असल्याने आमदार शंकर जगताप यांनी बैठक घेत प्रशासनाला चांगलेच सुनावले. पाण्याची गळती आणि अपव्यय रोखून नागरिकांना त्वरित समाधानकारक पाणीपुरवठा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
पिंपरी- चिंचवड शहरातील अनेक सोसायट्यांना सध्या निर्धारित कोट्यापेक्षा कमी पाणी मिळत असून, नागरिकांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. कडक उन्हाळ्यात पाण्याच्या या संकटामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार शंकर जगताप यांनी चिंचवडगावात पाण्याच्या टाकी खाली महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
या बैठकीत जगताप यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले. पाण्याची गळती, गैरवापर व अपव्ययाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत तातडीने उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले. व्यावसायिक वापराच्या तुलनेत पिण्याच्या पाण्याला पूर्ण प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
“पिण्याचे पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक आणि सोसायटीला नियमानुसार व पुरेसे पाणी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाने तातडीने कामाला लागावे,” असे स्पष्ट निर्देश आमदार जगताप यांनी दिले.
बैठकीस भाजपा जिल्हा सरचिटणीस नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माधुरी कुलकर्णी, माजी स्वीकृत नगरसेवक बिभीषण चौधरी, विठ्ठल भोईर, भाजपा उपाध्यक्ष शेखर चिंचवडे तसेच इतर स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनातर्फे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता दीपक पाटील, उपअभियंते चंद्रकांत मोरे व देसाई, कनिष्ठ अभियंता साकेत पावरा तसेच रघुनाथ शेमले, राहुल पाटील, सागर पाटील, संदीप ढेपले, शरद मोरे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत नागरिकांचे प्रश्न गांभीर्याने घेत तातडीने त्यावर कारवाई करण्याचे आश्वासनही अधिकाऱ्यांनी दिले.