महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पिंपरी-चिंचवड येथील ‘पत्रकार हल्ला विरोधी कायदा परिषदे’च्या कार्यक्रमाला हजेरी लावली. हा कार्यक्रम ‘पिंपरी चिंचवड एडिटर्स गिल्ड’च्या वतीने आयोजित केला होता. या कार्यक्रमातून राज ठाकरे यांनी पत्रकारांकडून दिल्या जाणाऱ्या चुकीच्या बातम्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी एक जुनी आठवण सांगितली. तसेच त्यांनी पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत चिंताही व्यक्त केली.

यावेळी राज ठाकरे म्हणाले, “हल्ला कुणावरही होऊ नये. पण हल्ला झाल्यावर जसा पत्रकारांना राग येतो, तसा आम्हालाही (राजकीय व्यक्तींना) राग येतो. काही वर्षांपूर्वी माझ्यावर एक खुनाचा आरोप झाला होता. सर्व वर्तमानपत्रांनी सर्व बाजुने माझ्यावर टीका केली. मी माझ्या घरात बसलो होतो. तेव्हा एका ‘सांज दैनिका’ची हेडलाईन होती की, “राज ठाकरे फरार”.”

“मी माझ्या घरात बसलो होतो. असं असताना त्या वृत्तपत्राने मी फरार असल्याची हेडिंग दिली. अशाप्रकारच्या बातम्या दिल्यानंतर माझ्यातला माणूस जागा होऊन कानशिलात मारली तर तुम्ही याला हल्ला म्हणणार आहात का? या गोष्टी दोन्ही बाजुंनी समजून घेणं गरजेचं आहे,” असं राज ठाकरे यांनी यावेळी नमूद केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पत्रकारांना उद्देशून राज ठाकरे पुढे म्हणाले, “तुमचं काम आमचे डोळे उघडणे आहे. तुमचं काम आम्हाला चिमटे काढणं आहे. तुमचं काम प्रबोधन करणं आहे. जर समजा आम्ही काही चुकीची पावलं टाकत असू तर आम्हाला सुधरवणं, हे तुमचं काम आहे. विनाकारण खोट्या बातम्या देणं चुकीचं आहे. नको त्या बातम्या करणाऱ्या पत्रकारांवर तुमची संघटना काय कारवाई करणार आहे का? हे सांगावं. बाकी इतर बाबतीत राज ठाकरे तुमच्यासोबत आहे.”