विद्यमान खासदार असूनही उमेदवारी नाकारल्याने संतापलेल्या गजानन बाबर यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. बाबर व त्यांच्या समर्थकांच्या मनसे प्रवेशाने मावळ लोकसभेची तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आरंभ सोमवारी पुण्यात केला. या सभेत खासदार बाबर यांच्यासह पिंपरीचे माजी नगरसेवक प्रकाश बाबर, विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सारंग कामतेकर, उपशहरप्रमुख रोमी संधू तसेच शिरूर मतदारसंघातील नेते रामदास धनवटे यांनी मनसेत प्रवेश केला.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या मावळ लोकसभेतून बाबर निवडून आल्याने सर्वानाच विशेषत: पवार काका-पुतण्यांना धक्का बसला होता. बाबर पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्यास तीव्र इच्छुक होते. पहिल्या यादीत त्यांचे नाव जाहीर झाले नाही. तथापि, शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी तुम्हालाच असल्याचा विश्वास दिला होता. त्यामुळे बाबरांनी निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली. कधी नव्हे तो, जोरदारपणे वाढदिवस साजरा केला. पाच वर्षांच्या कामाचा अहवाल तयार केला. मात्र, नाटय़मय घडामोडीनंतर त्यांची उमेदवारी कापण्यात आली. आपल्याला गाफील ठेवून तिकीट विकण्यात आल्याचा आरोप त्यांनी उद्धव ठाकरे व मिलिंद नार्वेकर यांना उद्देशून केला आणि शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. ते मनसेत जाणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. मात्र, त्यांनी शिवसेनेत परत यावे, यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू होते. तथापि, पुन्हा सेनेत जाण्यास त्यांनी नकार दिला. राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मनसे प्रवेशाचा त्यांचा मार्ग सुकर झाला. बाबर यांना मानणारा मोठा वर्ग पिंपरी-चिंचवड तसेच मावळ लोकसभेच्या क्षेत्रात आहे. त्यामुळे आगामी काळातील राजकीय समीकरणे बदलण्याचे स्पष्ट संकेत आहेत.