महापालिका शिक्षण मंडळाच्या मराठी तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी पडत असल्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांना तसेच शिक्षण मंडळातील सर्व अधिकाऱ्यांना महिन्यातून एक दिवस शाळेसाठी या उपक्रमात सहभागी करून घ्यावे आणि या उपक्रमाची सुरुवात तातडीने करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तसेच बालवाडी शाळांमध्येही शिक्षकांची संख्या सातत्याने कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. यावर मनसेतर्फे हा उपाय सुचवण्यात आला असून तसे निवेदन मनसेचे शहराध्यक्ष बाळा शेडगे, प्रकाश ढोरे, महापालिकेतील गटनेता वसंत मोरे, नगरसेवक रवींद्र धंगेकर, शिक्षण मंडळ सदस्य राम बोरकर आणि विनिता ताटके यांनी शनिवारी आयुक्तांना दिले. महापालिकेतील सर्व अधिकाऱ्यांना तसेच शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांना महिन्यातून एक दिवस शाळेसाठी या उपक्रमात सहभागी करून घ्यावे तसेच शिक्षण मंडळातील क्रीडा प्रमुख, सर्व सहायक शिक्षण प्रमुख, सर्व पर्यवेक्षक, सर्व शारीरिक संघटक यांनाही रोज एका शाळेवर जाऊन किमान चार तासिका घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. आयुक्त विकास देशमुख यांनी जिल्हा परिषदेत हा उपक्रम राबवला होता. त्याच धर्तीवर महापालिकेतही उपक्रम सुरू करण्याची विनंती आयुक्तांना करण्यात आली आहे.
या उपक्रमात अधिकाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस नेमून दिलेल्या शाळेवर जाऊन किमान अर्धा दिवस प्रत्यक्ष अध्यापनाचे काम करावे तसेच शाळा परिसरातील अडचणींची, शाळेतील सोयी-सुविधांची नोंद करावी, उणिवांची नोंद करावी व त्या सोडवण्याचाही प्रयत्न करावा, अशी अपेक्षा आहे. शाळांची दुरवस्था दूर करण्याच्या दृष्टीने तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग होईल, अशीही अपेक्षा आहे. शिक्षकसंख्या कमी असल्यामुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना न झाल्यास सोमवारी (७ जुलै) मंडळाच्या कार्यालयात आंदोलन केले जाईल, असाही इशारा मनसेने दिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jul 2014 रोजी प्रकाशित
‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रम पालिका अधिकाऱ्यांसाठी राबवा
शिक्षण मंडळातील सर्व अधिकाऱ्यांना महिन्यातून एक दिवस शाळेसाठी या उपक्रमात सहभागी करून घ्यावे आणि या उपक्रमाची सुरुवात तातडीने करावी, अशी मागणी मनसेतर्फे आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
First published on: 06-07-2014 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns pmc school teachers