“…मग नेमकं अडलंय कुठे?,” मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन राज ठाकरे संतापले

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून यावेळी त्यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं

MNS, Raj Thackeray, Raj Thackeray Press Conference, Municipal Election, Maratha Reservation, OBC Reservation
राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून यावेळी त्यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं

केंद्र आणि राज्य सरकार दोघांनाही मान्य आहे तर मग ओबीसी आरक्षण अडलंय कुठे? अशी विचारणा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून यावेळी त्यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकीत मनसेची एकला चलो रे भूमिका असणार का प्रश्नावर परिस्थिती पाहून निर्णय घेऊ असं उत्तर दिलं आहे.

“राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीचं सरकार असताना मराठा आरक्षणासाठी एक मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह सर्व पक्षांचे नेते त्यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यावेळी मी सगळ्यांनाच मान्य आहे तर मग अडकलंय कुठे असं विचारलं होतं. फक्त मुद्दा उपस्थित करायचा आणि माथी भडकावायची एवढाच उद्योग आहे का? ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही केंद्र, राज्य सरकार सर्वांना मान्य आहे तर अडलंय कुठे?,” अशी विचारणा राज ठाकरेंनी केली.

“एकनाथ खडसेंच्या सीडीची वाट पाहतोय”; ईडी कारवाईवरुन राज ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया

सर्वांना मान्य आहे त कोणी अडवलं आहे? अशी विचारणा करताना राज ठाकरेंनी कोर्टात व्यवस्थित बाजू का मांडली जात नाही असंही विचारलं. तसंच सगळ्यांना व्यासपीठावर आणून चर्चा केली पाहिजे अशी मागणी केली.

निवडणुकांच्या तयारीसाठी आलो असल्याचं मान्य करताना राज ठाकरेंनी सगळ्याच निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत त्यामुळे काय होईल याची कल्पना नसल्याचं म्हटलं. तसंच लॉकडाउनच्या काळात सरकारचा कारभार पहायला मिळालेलाच नाही. त्यामुळे समाधान कशावर व्यक्त करावं? असा टोलादेखील लगावला.

खडसेंच्या सीडीची वाट पाहतोय

एकनाथ खडसे यांच्या कारवाईबद्दल विचारले असता त्यांच्या सीडीची वाट पाहतोय असा टोला राज ठाकरेंनी लगावला. तसंच सरकारकडून यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे अशी टीकादेखील केली. “काँग्रेसचं सरकार होतं तेव्हाही असाच वापर करण्यात आला होता. भाजपाचं सरकार आल्यानंतर तेदेखील वापर करत आहेत. ही काही तुमच्या हातातली बाहुली नाही जिचा वापर तुम्हाला नको असलेला माणूस संपवण्यासाठी करायचा. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. अशाप्रकारे करुन चालणार नाही. ज्यांनी गुन्हे केलेत ते मोकाट सुटले आहेत,” असं राज ठाकरे म्हणाले.

माझा राज मोरे होणार नाही

“मी नवी मुंबई विमानतळाला नवं नाव देण्याची मागणी केलेली नाही. उद्या जर मी पुण्यात शिफ्ट होण्याचा विचार केला तर माझ नाव राज मोरे होणार नाही. (मनसेच्या शहर अध्यक्ष वसंत मोरे यांच नाव आहे). त्यामुळे मुंबई विमानतळ शिफ्ट होत असेल तर नाव कसं बदलेल?,” अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली.

राणेंना फोन केला होता

“नारायण राणेंना फोन केला होता, मात्र त्यांचा आणि त्यांच्या मुलांचादेखील फोन बंद होता. त्यामुळे मी एक दोन दिवसात फोन करेन,” असं राज ठाकरेंनी सागितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mns raj thackeray press conference municipal election maratha obc reservation sgy

ताज्या बातम्या