मनसेचे पुण्यातील कात्रज भागातील नेते वसंत मोरे यांच्या नाराजीनाट्यामुळे महिन्याभरापूर्वी पक्षात सारंकाही आलबेल नसल्याचं दिसून आलं. वसंत मोरेंना तडकाफडकी पुणे शहर अध्यक्षपदावरून बाजूला सारून साईनाथ बाबर यांच्यावर ती जबाबदारी सोपवली. तसेच, वसंत मोरेंना शिवतीर्थवर बोलावून राज ठाकरेंनी त्यांच्याशी चर्चा देखील केली. हे नाराजीनाट्य आता कुठे शांत झाल्याचं वाटत असतानाच आज पुण्यात राज ठाकरेंच्या सभेआधी वसंत मोरे यांनी खळबळजनक दावा करत पुन्हा एकदा चर्चेची राळ उडवून दिली आहे. वसंत मोरे यांनी शनिवारी रात्री केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये पक्षातील झारीतल्या शुक्राचार्यांना दूर केलं पाहिजे, असं म्हटलं होतं. त्यानंतर आज टीव्ही ९ शी बोलताना त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

“मतभेद मनभेदापर्यंत पोहोचलेत”

“मला राज ठाकरेंनी याबाबत विचारणा केली, तर मी त्यांना सांगेन. कारण संयम तुटण्याची वेळ कधीकधी येते. माझ्यापर्यंत विषय होता, तेव्हा मी सगळ्या गोष्टी रेटून नेत होतो. पण आज माझ्या कार्यकर्त्यांपर्यंत विषय आला आहे. मला वाटतं पदाधिकारी हा पदाधिकारी असतो. तो कधीच कुणाचा नसतो. तुम्ही त्याला व्यवस्थित वागणूक दिली, तर तो तुमच्यासोबतच असतो. इथे वसंत मोरे किंवा अजून कुणाचा ग्रुप नाही. तो पक्षाचा ग्रुप आहे. राज ठाकरेंना मानणारा ग्रुप आहे. पक्षात मतभेद असतात. पण आता मतभेद कुठेतरी मनभेदापर्यंत जायला लागले आहेत. ते जाऊ नयेत यासाठी मी प्रयत्न करतोय. पण वेगवेगळ्या माध्यमातून हे दाखवलं जातंय की आम्हाला काहीतरी वेगळं करून दाखवायचंय”, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.

“मला वाटतं की ज्या पद्धतीने पुण्यात काम सुरू आहे, त्यात लक्ष घालणं गरजेचं आहे. मी काल पक्षाच्या सर्व नेत्यांना रात्री माझं फेसबुक लाईव्ह टॅग केलं आहे. एखाद्या चॅनलवर दाखवलं, म्हणून त्याची कोणतीही सत्यता न पडताळता निलेश माझिरेंवर जी कारवाई केली, नंतर त्यांना जी वागणूक दिली की तू पक्षात राहणार आहेस का वगैरे. अशा पद्धतीने आजपर्यंत पक्षात कुणी बोलत नव्हतं. गेल्या महिन्याभरात पक्षात हुकुमशाहीचा प्रकार सुरू आहे. कुणालातरी शहरावर वेगळ्या पद्धतीने वट बसवायचा आहे. तो कामातून त्यांनी बसवावा. अशा कारवाया करून कार्यकर्ते तुटतील”, असा दावा त्यांनी यावेळी बोलताना केला.

“हे माझं दुर्दैव आहे की मला सारखं…!”

“हे दुर्दैव आहे माझं. मला सारखं का सांगावं लागतंय की मी मनसेत आहे. कोण यामागे आहे. कुणीतरी या सगळ्या गोष्टी घडवून आणतंय. मला जाणून बुजून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. मी राज ठाकरेंसमोर या गोष्टी मांडणार आहे. या गोष्टी राज ठाकरेंपर्यंत गेल्याच नसतील. त्यांना इथे काय चाललंय ते माहितीच नसेल. मी याबाबत पुण्यातील पक्षाच्या नेत्यांच्या कानावर गोष्टी घालतोय. गेल्या महिन्या-दीड महिन्यापासून मला सांगायला लागतंय की मी मनसेत आहे. हे झारीतले शुक्राचार्य शोधले पाहिजेत. त्यांच्यावर कारवाया व्हायला पाहिजेत. कोण पक्षातून कुणाला बाहेर घालवायला बघतंय त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजेत”, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

Raj Thackeray Pune Live : राज ठाकरेंची तोफ आज पुण्यात धडाडणार; गणेश कला क्रीडा परिसरात कडक पोलीस बंदोबस्त!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला कांड करायचा असता तर…”

“असं बोललं जातंय की वसंत मोरे निवडणुकीपूर्वी कांड करणार आहे. मी काय कांड करणार? मला कांड करायचा असता, तर कधीच केला असता. हे कुणीतरी पसरवतंय. हे पार्टटाईम जॉबवाले आहेत. त्यामुळे मी मनसे कार्यकर्त्यांना आवाहन केलंय की तुम्ही यांना फोडून काढा. इथे मी मोठा व्हायला हवा, माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, मला मान मिळायला हवा असं बोलणारे लोक आहेत”, अशा शब्दांत वसंत मोरेंनी पक्षांतर्गत वादावर भूमिका स्पष्ट केली आहे.