सध्या राज्यभरात मनसेच्यादृष्टीने फारसे उत्साहाचे वातावरण असले तरी पुण्यातील मनसेच्या एका महिला उमेदवाराला निवडणुकीपूर्वीच ‘गूड न्यूज’ मिळाली आहे. पुण्यातील मनसेच्या विद्यमान नगरसेविका रुपाली पाटील यांना प्रचारादरम्यानच पुत्रप्राप्ती झाली. येत्या २१ फेब्रुवारीला पुणे महानगरपालिकेसाठी मतदान होणार असून प्रचारासाठी उमेदवारांच्या हातात अवघे दहा दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रत्येक उमेदवार जोमाने प्रचार करत आहे. त्यात मनसेप्रमुख राज ठाकरे अजूनपर्यंच प्रचारात न उतरल्यामुळे पक्षाच्या उमेदवारांना स्वत:च्याच हिंमतीवर निवडून यावे लागणार आहे.
पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १५ मधून रूपाली पाटील निवडणूक लढवत आहेत. प्रभागातील अटीतटीच्या लढाईमुळे गरोदर असूनही त्यांना प्रचारात उतरावे लागले. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा प्रचार जोरात सुरू होता. मात्र, शुक्रवारी प्रभागात प्रचार सुरू असताना त्यांना अचानकपणे प्रसववेदना सुरू झाल्या. त्यानंतर रूपाली पाटील यांना तातडीने नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांना मुलगा झाला. त्यामुळे रुपाली पाटील यांच्या वैयक्तिक जीवनातील निकाल चांगला लागला असला तरी आता पालिका निवडणुकीचा निकाल काय लागणार, याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे डोळे लागून राहिले आहेत.
दरम्यान, पक्षाला लागलेल्या गळतीमुळे यंदाच्या महापालिका निवडणुका मनसेसाठी अवघड अाहेत. मुंबई, ठाणे आणि नाशिक या प्रमुख शहरांसह सर्वत्रच मनसेची पिछेहाट होताना दिसत आहे. मनसे कमकुवत झाल्याने गेल्या वेळी जिंकलेल्या जागांवर यंदा शिवसेना व भाजपचा डोळा असून, मनसेची मते कोणाकडे वळू शकतात याचा अंदाज दोन्हीकडून घेतला जात आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत गेल्या वेळी मनसेचे २८ नगरसेवक निवडून आले होते. पाच वर्षांपूर्वी होती तशी हवा यंदा मनसेची दिसत नाही. गतवेळच्या तुलनेत मनसे कमकुवत झाल्याचा फायदा उठविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे, पण त्याच वेळी मनसेची मते आपल्याकडे वळविण्यासाठी भाजपही प्रयत्नशील आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मनसेच्या जागा कमी झाल्या होत्या. त्याचा फायदा भाजपला झाला होता. २०१०च्या तुलनेत २०१५च्या पालिका निवडणुकीत मनसेचे संख्याबळ घटले. मनसेच्या जागा कमी झाल्या, पण त्याचा फायदा भाजपला झाला होता. पुणे आणि नाशिकमध्ये मनसेच्या फुटिरांनी भाजप आणि शिवसेनेचा मार्ग स्वीकारला. मनसेच्या मतांचा फायदा उठविण्याचा भाजपचा या दोन्ही शहरांमध्ये प्रयत्न आहे.
गेल्या वेळी मिळालेल्या जागा किंवा मते यंदा मनसेला मिळण्याची शक्यता कमी आहे. ही मते आपल्याकडे वळविण्याकरिता शिवसेना प्रयत्नशील आहे. मनसेच्या पारंपरिक मतदारांना भाजपपेक्षा केव्हाही शिवसेना अधिक जवळची आहे. परिणामी, ही मते शिवसेनेला मिळू शकतात, असे सेनेचे गणित आहे. कल्याण-डोंबिवलीच्या धर्तीवर मुंबईतही मनसेची मते आपल्याला कशी मिळतील याचे नियोजन भाजपच्या वतीने केले जात आहे. मनसेच्या ताब्यातील ८ ते १० जागा मिळाल्या तरी संख्याबळात वाढ होऊ शकते, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. मुंबईतील आपला प्रभाव कायम ठेवण्याकरिता मनसे प्रयत्नशील आहे. पण गेल्या वेळच्या तुलनेत मते न मिळाल्यास पक्षाची अडचण होऊ शकते.