पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या आगामी साहित्य संमेलनातील तरुणाईचा सहभाग वाढविण्यासाठी मोबाईल अॅप्लिकेशन तयार करण्यात येणार आहे. माहिती तंत्रज्ञानाची कास धरीत आधुनिकतेकडे वाटचाल करण्याच्या उद्देशातून साहित्य संमेलन ‘मोबाईल अॅप’वर नेण्याचा हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलनाचे संकेतस्थळ विकसित करण्यात येत आहे. त्या माध्यमातून संमेलनातील कार्यक्रम, संमेलनाध्यक्षांचा परिचय, संमेलनपूर्व संमेलनामधील ठळक घडामोडी यासंदर्भातील माहिती वेळोवेळी दिली जाते. मात्र, आता जवळपास प्रत्येकाच्या हाती असलेल्या स्मार्ट फोनच्या युगामध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये होणारे संमेलन आधुनिकतेच्या दृष्टिकोनातून पुढचे पाऊल टाकणार आहे. आगामी संमेलनाला एका क्लिकवर आणतानाच संमेलनातील तरुणाईचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशातून मोबाईल अॅप विकसित करण्याचा निर्णय डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी या संमेलनाच्या संयोजक संस्थेने घेतला आहे.
संस्थेचे सचिव सोमनाथ पाटील यांनी मांडलेली अॅपची संकल्पना लवकरच मूर्त स्वरूपात साकारणार असून त्यासाठी दोन अॅप डेव्हलपरशी बोलणे सुरू असल्याची माहिती स्वागत समितीचे समन्वयक सचिन इटकर यांनी दिली. या अॅपमध्ये संमेलनाची माहिती, कार्यक्रम पत्रिका, संमेलनाच्या कार्यक्रमातील वक्ते, वृत्तपत्रातील बातम्या, व्हिडीओ उपलब्ध करून दिले जाणार आहे. मोबाईल अॅप्लिकेशन हे तरुणाईच्या जवळचे माध्यम झाले आहे. सातत्याने मोबाईल वापर करणाऱ्या तरुणांच्या जवळचे माध्यम झाल्यामुळे हे संमेलन त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न म्हणूनच आम्ही या अॅपचा पर्याय स्वीकारला आहे. याखेरीज संमेलनाचे स्वतंत्र संकेतस्थळही असेल. मात्र, केवळ संकेतस्थळ असे मर्यादित स्वरूप न ठेवता पोर्टल असावे ही संकल्पना आहे. त्यामध्ये दुर्मीळ पुस्तके, गाजलेल्या भाषणांच्या ऑडिओ-व्हिडिओ क्लिप्स आणि मराठी साहित्यविषयक सर्वागीण माहिती उपलब्ध करून देण्याचा मानस आहे, असेही इटकर यांनी सांगितले.