राज्य मंडळातर्फे होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी थोडाच काळ बाकी असताना अद्याप नमुना प्रश्नपेढी उपलब्ध झालेली नाही. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर (एससीईआरटी) गेल्यावर्षीच्या ७५ टक्के अभ्यासक्रमावरील प्रश्नपेढीच उपलब्ध असून, यंदा विद्यार्थ्यांना प्रश्नपेढी मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- पुणे महापालिका भवनासमोरील नदीकाठ परिसर कचऱ्याच्या विळख्यात

करोना काळात झालेले ऑनलाइन वर्ग, लेखनाचा सुटलेला सराव आदी कारणांमुळे दहावी-बारावीचा अभ्यासक्रम कमी करून ७५ टक्के करण्यात आला होता. तसेच परीक्षेसाठी काही सवलती देण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव होण्यासाठी प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. त्यानुसार राज्य परीक्षा परिषदेने गेल्यावर्षी प्रश्नपेढी उपलब्ध करून दिली होती. यंदा परिस्थिती पूर्वपदावर आल्याने शंभर टक्के अभ्यासक्रमावर आणि करोना पूर्व काळातील पद्धतीनुसार परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानुसार यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. मात्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर गेल्यावर्षीचीच प्रश्नपेढी उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरावासाठी प्रश्नपेढी मिळणार की नाही, असा प्रश्न पालक-विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

हेही वाचा- पुणे : तीन वर्षांत कसब्यातील मतदारांत १५ हजाराने घट; चिंचवडमध्ये ४८ हजार मतदार वाढले

मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य प्रवक्ता महेंद्र गणपुले म्हणाले, की यंदा दहावी-बारावीची परीक्षा पूर्ण अभ्यासक्रमावर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सरावासाठी पूर्ण अभ्यासक्रमावरील नमुना प्रश्नपेढी उपलब्ध होणे आवश्यक आहे.

नवी प्रश्नपेढी लवकरच उपलब्ध

गेल्यावर्षीची प्रश्नपेढी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याशिवाय उर्वरित २५ टक्के अभ्यासक्रमावरील प्रश्न तयार करण्याचे काम सुरू आहे. पुढील काही दिवसांत संपूर्ण प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात येईल, असे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Model question paper of 10th and 12th exam is not available yet pune print news ccp 14 dpj
First published on: 26-01-2023 at 11:55 IST