पुणे : ‘पंडित चिंतामणी व्यासांच्या गाण्यात कोणताही अभिनिवेश नव्हता. आक्रस्ताळेपणा नव्हता. त्यांचे गाणे भारदस्त होते. त्यात शांतता होती, आध्यात्मिक अनुभव होता. व्यासांचे गाणे स्वत:च्या आतमध्ये डोकवायला भाग पाडणारे होते,’ असे मत लेखिका मोनिका गजेंद्रगडकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.
पॉप्युलर प्रकाशनातर्फे पंडित सी. आर. व्यास यांच्या सांगीतिक जीवनप्रवासावरील ‘चिंतामणी : एक चिरंतन चिंतन’ या पुस्तकावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. चर्चासत्रात गजेंद्रगडकर यांच्यासह पंडित सुहास व्यास, लेखक श्रुती पंडित आणि शशी व्यास सहभागी झाले होते. प्रकाशक अस्मिता मोहिते यांनी त्यांच्याशी संवाद साधला. पूर्वार्धात अपर्णा केळकर यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
गजेंद्रगडकर म्हणाल्या, ‘संगीत हे तुम्हाला स्वत:च्या आत घेऊन जाते. मनाच्या तळापर्यंत जाण्यासाठी ते मदत करते. व्यासांच्या संगीताला अध्यात्माची बैठक होती. डोळे मिटून शांतपणे त्यांचे संगीत ऐकावे म्हणजे स्वत:ला शोधण्याचा प्रवास सुरू होतो. संगीत साधनेसाठी अपार कष्ट घ्यावे लागतात. व्यासांच्या संगीतातही मोठी तपस्या होती. त्यांचे गाणे स्वत:ला विसरायला भाग पाडणारे होते. संगीत हे तुम्हाला तुमच्याशी भेट घडवून देते. व्यासांचे गाणे ऐकले की त्याची प्रचिती येते.’
‘चिंतामणी व्यासांनी परंपरेला जपत स्वत:ची स्वतंत्र चाल निर्माण केली. त्यांची घराण्यांशी बांधिलकी आहे. मात्र त्यात कठोरता नाही. दुसऱ्या घराण्यात जे जे चांगले आहे, ते ते त्यांनी स्वीकारले, गाण्यात आणले. त्यांच्याकडे असणारी प्रयोगशीलता खूप कमी गायकांकडे आहे. त्यांनी गाण्यात राजकारण आणले नाही. त्यांनी घराण्यांच्या वादात भाग घेण्यापेक्षा त्यातल्या गुणांचे ग्रहन केले. त्यामुळे त्यांचे गाणे कानात सतत रुंजी घालत असते,’ असे गजेंद्रगडकर म्हणाल्या.
चांगल्या गायकाकडे सातत्य असणे गरजेचे असते. अध्यात्माची बैठक गरजेची असते. रियाज आणि अध्यात्म असल्यामुळे बाबांच्या गाण्याचा सूर मैफिलीतील शेवटच्या माणसाच्या काळजात जात असे. त्यांच्या शिष्यांनाही त्यांनी सर्व काही दिले. हातचे राखून ठेवले नाही. – पंडित सुहास व्यास