पुणे : एकंदर सर्वसाधारण सरासरीची नोंद करीत मोसमी पावसाचा चार महिन्यांचा हंगाम समाप्त झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शनिवारी जाहीर केले. दीर्घकाळापासून हंगामात सरासरी ८६८.६ मिमी पाऊस होत आला असला तरी यंदा ‘एल निनो’चा प्रभाव असतानाही सरासरी ८२० मिमी पाऊस झाल्याचे हवामान विभागाने सांगितले.
प्रशांत महासागरात ‘एल-निनो’ सक्रिय असूनही यंदा मोसमी पाऊस सामान्य राहिला. देशभरातील पर्जन्यमान विचारात घेता सरासरीच्या ९४.४ टक्के मोसमी पाऊस झाला. ‘एल-निनो’चा प्रभाव मार्च २०२४ पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, हिंदू महासागरीय द्वि-ध्रुविता (इंडियन ओशन डायपोल) डिसेंबरअखेरपर्यंत सक्रिय राहणार आहे. त्याचा चांगला परिणाम दक्षिण भारतातील यापुढील पावसावर होऊ शकतो, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिली.
हेही वाचा >>> सातारा:आनंदाचा शिधा वितरणात मुख्यमंत्र्यांचा सातारा जिल्हा राज्यात प्रथम
ऑनलाइन पत्रकार परिषदेत महापात्रा म्हणाले, की १ जून ते ३० सप्टेंबर हा मोसमी पावसाचा कालखंड आहे. यंदा या कालखंडातील पाऊस सामान्य राहिला. या काळात देशात सरासरी ८६८.६ मिमी पाऊस पडतो, यंदा ८२० मिमी पाऊस झाला. हा पाऊस सरासरीच्या ९४.४ टक्के आहे. सरासरीच्या ५.६ टक्के पाऊस कमी झाला आहे. मात्र, सरासरीच्या ९४ ते १०६ टक्के प्रमाण ‘सामान्य’ धरले जाते. त्यामुळे यंदा मोसमी पर्जन्यमान देशभरात सामान्य राहिले.
प्रशांत महासागरात ‘एल-निनो’ सक्रिय झाला होता. त्यामुळे यंदा देशात कमी पर्जन्यमानाचा अंदाज होता. यंदा पाऊस उशिरा सक्रिय झाला. त्यामुळे जूनमध्ये सरासरीच्या कमी पाऊस झाला. जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला; देशाच्या बहुतेक भागांत मोठा खंड पडला. सप्टेंबरमध्ये पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावत सरासरी भरून काढली. हवामान विभागाच्या उपविभागांचा विचार करता, ७३ टक्के भागांत सामान्य पर्जन्यवृष्टी झाली. १८ टक्के भागांत कमी पाऊस झाला. पूर्व आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा १८ टक्के कमी पाऊस झाला. पश्चिम आणि मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. दक्षिण भारतात सरासरीच्या ८ टक्के कमी पाऊस झाला आहे.
ऑक्टोबरचा अंदाज..
- ‘एल-निनो’ सक्रिय असतानाही सामान्य पर्जन्यवृष्टी
- हिंदू महासागरीय द्वि-ध्रुवितेचा (आयओडी) फारसा सकारात्मक परिणाम नाही.
- बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य भारतात, मुख्य प्रभाव क्षेत्रात चांगला पाऊस.
- ‘आयओडी’मुळे ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यान दक्षिण भारतात चांगल्या पावसाचा अंदाज.
बिगरमोसमी कमी प्रमाणात..
ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान देशात सरासरी ३३४.१३ मिमी बिगरमोसमी पाऊस पडतो. यंदा उत्तर गुजरात आणि राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस अपेक्षित आहे. मात्र, राज्यात दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील काही ठिकाणांचा अपवादवगळता सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.
कोणत्या महिन्यात किती?
महिना प्रमाण
जून ९१%
जुलै ११३%
ऑगस्ट ६४%
सप्टेंबर ११३%