पुणे : अंदमानाच्या समुद्रात सोमवारी मोसमी पाऊस (र्नैऋत्य मोसमी वारे) सोमवारी दाखल झाला. यंदा मोसमी पाऊस पाच ते सहा दिवस आधीच अंदमानात आल्याने केरळात तो २५ ते २७ मे, तर तळकोकणात २ जूनपर्यंत येण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरवर्षी अंदमानात र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन २२ ते २४ मे दरम्यान होते, तर केरळमध्ये मोसमी पाऊस १ ते ३ जूनला दाखल होतो. मात्र यंदा र्नैऋत्य मोसमी वारे अंदमानातच सहा दिवस आधी येऊन धडकले. ते आता वेगाने पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात पुढे सरकत आहेत. हवामानतज्ज्ञांच्या मते यंदा र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग पाहता ते तळकोकणात ८ ते १० जूनऐवजी २ ते ३ जूनला येण्याची शक्यता आहे. र्नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनामुळे वाऱ्यांचा वेग वाढला असून मध्य भारतातील कमाल आणि किमान तापमान तीन ते चार अंशांनी घटणार असल्याचा अंदाज आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

आज मुसळधार?

महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत १७ ते १९ मे या कालावधीत विजांचा कडकडाट आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

१३ जिल्ह्यांना इशारा

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या १३ जिल्ह्यांना पिवळा इशारा देण्यात आला आहे.