माझ्या उमेदवारीबाबत खूप चर्चा झाल्या त्या आता संपल्याही. त्यानंतर आता ज्याचा शेवट गोड तर सर्व गोड असं मराठीत आपण म्हणतो. त्यानुसार, मी १ लाख ६० हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येईल. आता महायुतीचा आकडा २२० पार जाऊन २५० ला टच होईल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुड मतदारसंघातील उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. कोथरुडमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पाटील म्हणाले, २०१४ पासूनचा मतदारांचा कल आजही दिसून येत आहे. मोदींनी एक पारदर्शक सरकार या देशाला दिलं. त्यानंतर जनतेचा मतदानावरचा, राजकारणावरचा आणि राजकारण्यांवरचा विश्वास वाढत चालला आहे. आजचा उत्साह तर अक्षरशः अवर्णनिय आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रांवर रांगा लागल्या आहेत. यामध्ये वृद्ध, अपंग, महिलांचे प्रमाणही मोठे आहे. लोकांच्या देहबोलीवरुन जो कल लक्षात येतोय तो भाजपा आणि महायुतीचे सरकार खूप मोठ्या फरकानं निवडून येणार असल्याचा आहे.

बारामतीमध्ये प्रचाराच्या सांगतेवेळी शरद पवारांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, राज्यात वारे बदलल्याचे त्यांना एकट्यालाच दिसते आहे, त्यांच्या पाठीमागेही ते कोणाला दिसत नाही.

धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंबाबतंच विधान निंदनीय 

राजकारण हे निवडणुकीच्या कालावधीपर्यंतच राहिलं पाहिजे त्यानंतर सगळंच संपलं पाहिजे. मात्र, या काळातही राजकारण्यांनी मुद्द्यांवरच बोलले पाहिजे, पातळी सोडून चालणार नाही. धनंजय मुंडे पंकजाताईंबद्दल जे बोलले ते पूर्णपणे निंदनीय, निषेधार्ह आहे. इतक्या खालच्या तापळीवर गेलेलं राजकारण महाराष्ट्रातील सुसंस्कृत माणसाला आवडणार नाही.

संध्याकाळी कोल्हापूरात जाऊन मतदान करणार

सकाळी सात वाजल्यापासून मी कोथरुड मतदारसंघात फिरतो आहे. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता मी हेलिकॉप्टरने कोल्हापूरला जाणार असून सहा वाजण्याच्या आत तिथे जाऊन मतदान करेन, असेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.