पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी कचरा डेपोत मागील ३४ वर्षांपासून जमा केलेल्या कचऱ्याची ‘बायोमायनिंग’द्वारे विल्हेवाट लावण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात आठ लाख क्युबिक मीटर कचरा हटविल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील काम हाती घेण्यात आले आहे. डेपोतील ‘कचऱ्याचा डोंगर’ १२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत भुईसपाट करण्यात येणार आहेत.

डोंगर भुईसापाट केल्यानंतर २५ एकर जागा उपलब्ध होणार असून, दुर्गंधीचे प्रमाण कमी होईल, असा दावा महापालिकेच्या पर्यावरण विभागाने व्यक्त केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखांवर पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच कचरा संकलनातही वाढ होत आहे. दिवसाला १४०० टन कचरा तयार होतो. त्यात ओला, सुका, हॉटेल, भाजी मंडई, जैव वैद्यकीय या प्रकारचा कचऱ्याचा समावेश आहे. संपूर्ण शहरातील कचरा घंटागाडीद्वारे संकलित केला जातो. मोशीतील ८१ एकर जागेत हा कचरा जमा केला जातो. १९९१ पासून येथे कचरा टाकला जातो. मागील ३४ वर्षाच्या कचऱ्यामुळे डेपोची २५ एकर जागा व्यापली आहे.

कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहेत. परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे महापालिकेने ‘बायोमायनिंग’द्वारे कचऱ्याचे डोंगर हटविण्याचे काम सुरु केले आहे. पहिल्या टप्प्यात आठ लाख क्युबिक मीटर कचरा हटविण्यात आला. या कामासाठी ४२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात १५ लाख क्युबिक मीटर कचरा हटविण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी १०५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम १२ नोव्हेंबर २०२६ पूर्ण करण्यात येणार आहे.

२७ कोटींचे अनुदान

या कामासाठी महापालिकेला स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत २७ कोटी ५० लाख रूपयांचे अनुदान मिळाले आहे. स्वच्छ भारत अभियानाची २०२६ ची मुदत संपण्यापूर्वी ही कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेने जुन्याच दोन ठेकेदारांकडून दुसऱ्या टप्प्यातील काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

कचऱ्यापासून वीज, सीएनजी, पेव्हिंग ब्लॉक, खत

कचऱ्याची विविध प्रकारे विल्हेवाट लावली जात आहे. पाचशे टन क्षमतेचा मॅकेनिकल खतनिर्मितीचा प्रकल्प सुरु आहे. त्यात खताची निर्मिती करुन विक्री केली जात आहे. प्लास्टिकच्या कचऱ्यापासून ऑइल तयार केले जातात. सुक्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जाते. हॉटेलमधून गोळा होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती करण्याच्या प्रकल्पातून सीएनजी इंधन तयार केले जाते. बांधकाम राडारोड्यावर प्रक्रिया करुन पेव्हिंग ब्लॉक, खडी, वाळू तयार केली जात आहे. हे साहित्य बांधकामासाठी वापरले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कचरा वेगळा केला जातो. त्यातून खत, माती, वाळी, प्लास्टिक, धातू वेगळे करुन त्याची विल्हेवाट लावली जाते. पहिल्या टप्प्यात आठ लाख क्युबिक मीटर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली. कचऱ्याचे डोंगर कमी होऊन नोव्हेंबर २०२६ अखेर २५ एकर जागा पूर्णपणे रिकामी होणार आहे. त्यामुळे ही जागा उपलब्ध होणार आहे. – संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका