पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसचे गेल्या तीन वर्षांत एकूण ३८५ अपघात झाले असून, त्यातील सर्वाधिक २३७ अपघात ठेकेदारांच्या बसचालकांकडून झाल्याची माहिती ‘पीएमपी’च्याच आकडेवारीतून उघडकीस आली आहे.

‘पीएमपी’ पुणे शहराच्या छोट्या-मोठ्या रस्त्यांपासून, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) ग्रामीण हद्दीपर्यंत ३९२ मार्गांवरून धावते. सध्या पीएमपीच्या ताफ्यात स्व-मालकीच्या ६५० बस असून, तर ठेकेदारांकडे ९५० बस संचलनासाठी आहेत.

पीएमपीने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२२ ते १० जून २०२५ या कालावधीत ‘पीएमपी’च्या स्वमालकीच्या आणि ठेकेदारांच्या बसचे मिळून एकूण ३८५ अपघात झाले. त्यात सर्वाधिक २३७ अपघात ठेकेदारांच्या बसचालकांकडून झाले आहेत. या अपघातांमध्ये ५१ नागरिकांना प्राण गमवावे लागले, तर ७४ जण गंभीर जखमी झाले. तसेच ‘पीएमपी’च्या स्व-मालकीच्या बसच्या १४८ अपघातात ३६ नागरिक मृत्युमुखी पडले, तर ३६ गंभीर जखमी झाले.

‘पीएमपी’च्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर

गेल्या आठवड्यात १० जून रोजी दौंड तालुक्यातील राहू-देवकरवाडी परिसरात रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या पादचाऱ्याला पीएमपीने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या तीन वर्षांत दर महिन्याला आठ ते दहा अपघात झाले आहेत. त्यात ८७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ११० गंभीर आणि १८८ किरकोळ जखमी झाले असल्याची ‘पीएमपी’चीच माहिती आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठेकेदारांकडून पुरवण्यात येणारे चालक प्रशिक्षित असणे अनिवार्य करण्यात आले आहे. चालकांसाठी वेळोवेळी समुपदेशन सत्रे आणि शिबिरे आयोजित केली जातात. – सतीश गव्हाणे, मुख्य व्यवस्थापक, संचलन विभाग, पीएमपीएमएल.