पुणे : पुढे जाण्यास जागा न दिल्याने मोटारचालक तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना सेनापती बापट रस्त्यावरील वेताळबाबा चौकात घडली. तरुणावर वार करुन आरोपी मोटारीतून पसार झाले. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसंनी तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. पृथ्वीराज कुमार नरवडे (वय १९, रा. भोसलेनगर, गणेशखिंड रस्ता) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी महेश प्रमोद पवार (वय २९), रोहित अशोक धोत्रे (वय २४), आकाश विलास कुसाळकर (वय ३४, रा. वडारवाडी) यांना अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज आणि आरोपी हे ओळखीचे नाहीत. शनिवारी (२ ऑगस्ट) दुपारी पृथ्वीराज सेनापती बापट रस्त्याने मोटारीतून निघाला होता. त्या वेळी आरोपी पवार, धोत्रे, कुसाळकर हे पाठीमागून त्यांच्या मोटारीतून आले. पुढे जाण्यास जागा न दिल्याने आरोपींनी पृथ्वीराजला शिवीगाळ करुन त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर आरोपींनी मोटारीतून त्याचा पाठलाग केला,

सेनापती बापट रस्त्यावरील गजबजलेल्या वेताळबाबा चौकात आरोपींनी मोटारचालक पृथ्वीराज याची मोटार दुपारी दीडच्या सुमारास अडवली. आरोपींनी त्यांची मोटार आडवी लावली. आरोपींनी पृथ्वीराज याला त्याच्या मोटारीतून बाहेर ओढले. त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. एका आरोपीने पृथ्वीराजच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. ‘तुला आता जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. भर चौकात मोटारचालक तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याने घबराट उडाली. या घटनेची माहिती माहिती मिळताच चतु:शृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पसार झालेले आरोपी पवार, धोत्रे, कुसाळकर यांना अटक केली.

शहरात किरकोळ वादातून हाणामारीच्या घटना वाढल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी हडपसर भागात धक्का लागल्याने मोटारचालक तरुणावर कोयत्याने वार करुन टोळक्याने त्याचा खून केल्याची घटना घडली होती. रस्त्यावर झालेल्या वादातून लष्कर भागात दुचाकीस्वार तरुणी आणि तिच्या आईला बेदम मारहाण करण्यात आली होती. बाणेर-पाषाण रस्त्यावर एका दुचाकीस्वार तरुणीला मोटारचालकाने बेदम मारहाण केल्याची घटना वर्षभरापूर्वी घडली होती. रस्त्यावर झालेल्या वादातून बेदम मारहाण, शिवीगाळ असे प्रकार शहरात घडतात. वादातून खुनाचा प्रयत्न, खून असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे शहरात घडले आहेत.