पुणे : नवले पूल परिसरातील अपघात टाळण्यासाठी त्या परिसरातील महामार्गावर वाहनांची वेगमर्यादा ३० किलोमीटर प्रतितास करण्यात आली आहे. ठिकठिकाणी स्पीडगन लावून त्याची खातरजमाही केली जाईल. तसेच, खेड शिवापूर टोलनाका येथे अवजड वाहनांची तपासणी करून वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल असल्यास जागेवरच माल उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवले पूल परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात नऊ ते दहा जण जखमी झाले. त्यानंतर पुण्याचे खासदार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरास भेट दिली. शासकीय विश्रामगृहात शनिवारी मोहोळ यांनी विविध यंत्रणांमधील अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त (पीएमआरडीए) डाॅ. योगेश म्हसे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, राज्य महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मोहोळ म्हणाले, ‘या ठिकाणी वाहनांसाठी वेगमर्यादा ६० किलोमीटर प्रतितास होती. ती ३० किलोमीटर प्रतितास करण्यात आली आहे. ठिकठिकाणी स्पीडगन लावण्यात येणार आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध जागेवरच कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे.’

‘अपघात रोखण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. विविध यंत्रणांकडून याबाबत केलेल्या कामाचा अहवाल महिनाभरात सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. डिसेंबर महिन्यात कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक निश्चित करण्यात आली आहे,’ असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

‘नऱ्हे ते रावेतदरम्यान उन्नत मार्गाचा आराखडा मंजूर झाला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यात येणार असून, हे काम प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. जांभूळवाडी ते वारजे परिसरापर्यंत वर्तुळाकर मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या मार्गाने वाहतूक वळविली जाऊ शकते. दरी पूल ते वडगाव बुद्रुक भरधाव जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी तीन स्पीड गन आहेत. त्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. स्वामिनारायण मंदिर ते नवले पूलदरम्यान तीव्र उतार आहे. तेथे गतिरोधक पट्ट्या (रम्बल स्ट्रिप) बसविण्यात आल्या आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.

या प्रश्नांचीही उत्तरे हवीत

  • उतार असलेल्या रस्त्यावर काही ठरावीक अंतरासाठी वेगमर्यादा एकदम ३० किलोमीटर प्रतितास करणे किती जोखमीचे असेल, याचा शास्त्रीय अभ्यास केला गेला आहे का? वेग आधीपासूनच हळूहळू कमी करण्याच्या सूचना देण्यात येतील, किंवा कसे, याचा उलगडा झालेला नाही.
  • टोलनाक्यावर अवजड मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांची तपासणी होणार आहे. या गाड्या तपासणीसाठी थांबविल्यानंतर तेथे कोंडी होऊ शकते. यावर काय उपाय दृष्टिक्षेपात आहेत?

टोलनाक्यावर अवजड वाहनांची तपासणी

‘बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर टोलनाका येथे ट्रक, कंटेनरचालकांची तपासणी करण्यात येणार आहे. जड वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल असल्यास तो जागेवरच उतरविण्यात येईल. जड वाहनांची तांत्रिक, तसेच ब्रेक तपासणी करण्यात येणार आहे. दरी पूल ते वडगाव बुद्रुक परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जड वाहनांविरुद्ध जागेवरच कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे,’ असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

‘भूसंपादन, अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लावा’

‘भूसंपादनामुळे बाह्यवळण मार्गावरील सेवा रस्त्यांचे काम रखडले आहे. पाषाण भागात संरक्षण विभागाची जागा आहे. सेवा रस्त्यासाठी ती जागा मिळविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. सेवा रस्त्यावर पीएमपी बस, तसेच खासगी वाहतूकदारांचे बेकायदा थांबे आहेत. प्रवाशांची सुरक्षा विचारात घेऊन थांबे बांधले पाहिजेत. बाह्यवळण मार्गावरून दररोज साडेतीनशे पीएमपी बसच्या फेऱ्या होतात. सेवा रस्त्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करावी,’ असा आदेश मुरलीधर माेहोळ यांनी दिला.