महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या प्रथम उत्तरतालिकांवर हरकती-सूचना नोंदवण्यासाठी आता उमेदवारांना शुल्क भरावे लागणार आहे. त्यात प्रत्येक प्रश्नासाठी शंभर रुपये आणि ४४ रुपये सेवा शुल्क या प्रमाणे शुल्क आकारले जाईल. 

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षांच्या प्रथम उत्तरतालिकांसाठी ऑनलाइन पद्धतीने हरकती नोंदवण्याची सोय एमपीएससीने करून दिली आहे. त्यानुसार उमेदवारांकडून हरकती सूचना नोंदवल्या जातात. मात्र या प्रक्रियेसाठी आता शुल्क लागू करण्यात आले आहे. हरकती नोंदवताना उमेदवारांकडून सामूदायिक पद्धतीने हरकती नोंदवण्यात आल्याचे वारंवार निदर्शनास आले.

तसेच मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवण्यात  आल्याने त्याची छाननी प्रक्रिया, दुरुस्ती यात बराच वेळ जातो. या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून प्रामाणिक, वस्तुनिष्ठ, सप्रमाण हरकती दाखल होण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे एमपीएससीकडून सांगण्यात आले. १ जुलैपासून होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हा निर्णय लागू असेल, असेही एमपीएससीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

एमपीएससीचे सहसचिव सुनील अवताडे म्हणाले, की उत्तरतालिकांवर ऑनलाइन पद्धतीने हरकती सादर करण्यासाठी दिलेल्या सोयीमुळे एमपीएससीच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे त्याची प्रतिपूर्ती होण्यासाठी शुल्क लागू करण्यात आले आहे. कर्मचारी निवड आयोग, राजस्थान लोकसेवा आयोग यांच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला.