पिंपरी : उकळत्या पाण्याचा ड्रम अंगावर पडल्याने ८० टक्के भाजलेल्या खेड तालुक्यातील पाळू येथील अश्विनी बाबूराव केदारी (वय ३०) यांचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ११ दिवसांपासून त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. अश्विनी या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत २०२३ मध्ये महाराष्ट्रातून मुलींमधून प्रथम आल्या होत्या. त्यांचे जिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न अधुरे राहिले.
पुण्यातील खेड तालुक्यातील पाळू येथील शेतकरी कुटुंबातील अश्विनी होत्या. २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून मुलींमधून त्या प्रथम आल्या होत्या. त्यांनी जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू होती. त्यांचा अभ्यास सुरू होता. २८ ऑगस्ट रोजी रात्री त्यांनी इलेक्ट्रिक हिटर सुरू केल्याचे त्या विसरल्या आणि झोपी गेल्या. त्यांना पहाटे तीनच्या सुमारास त्यांना जाग आली. त्यांनी तत्काळ हिटर बंद केला.
प्लास्टिकचा ड्रम गरम पाण्याने वितळू लागला होता. त्यातून गरम पाणी मगने बाहेर काढताना, त्यांचा धक्का ड्रमला लागला आणि ड्रम कलंडून उकळते पाणी त्यांच्या अंगावर पडले. त्यात त्या ८० टक्के भाजल्या होत्या, असे म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी सांगितले. मोशीतील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अश्विनी यांना पिंपरीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. ११ दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती; पण अखेर ती अपयशी ठरली. उपचारादरम्यान रविवारी सकाळी अकरा वाजता त्यांचा मृत्यू झाला. गरम पाणी अंगावर पडून भाजल्याने रक्तात संसर्ग (सेप्टिक) झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अश्विनी केदारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. – बापू बांगर, पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन, पिंपरी-चिंचवड.