मीटरमध्ये फेरफार किंवा विजेच्या तारांवर आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध महावितरणने कंबर कसली आहे. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्यात १८७६ ठिकाणी ४ कोटी ५७ लाख रुपयांच्या वीजचोऱ्या महावितरणने उघडकीस आणल्या आहेत. या वीजचोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याचे कलम १३५ प्रमाणे फौजदारी कारवाईही सुरू करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महावितरणकडून घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिकसह सर्व वर्गवारीमध्ये मागेल त्यांना तसेच हव्या त्या वीजभाराची अधिकृत वीजजोडणी उपलब्ध असतानाही वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत. त्यानुसार वीजचोरांविरुद्ध जोरदार मोहीम राबविली जात आहे. मोहिमेला आणखी वेग देण्यासाठी नाळे हे स्वत: या मोहिमेत विविध ठिकाणी भेटी देऊन महावितरणच्या पथकांना मार्गदर्शन करीत आहेत.

उघडकीस आलेल्या सर्व वीजचोऱ्यांप्रकरणी भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कलम १३५ प्रमाणे कारवाई सुरू आहे. वीजचोरी प्रकरणात दंडात्मक रकमेसह चोरीच्या वीजवापराप्रमाणे संपूर्ण बिलाची रक्कम न भरणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. विद्युत अपघाताचा धोका असणाऱ्या विजेची चोरी करण्याऐवजी अधिकृत वीजजोडणी घेऊन मोठय़ा रकमेची दंडात्मक किंवा फौजदारी कारवाईमधील कारावासाची शिक्षा टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. वीजचोरीविरोधी असलेली ही मोहीम यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात ३.९९ कोटींची वीजचोरी

पुणे जिल्ह्यासह प्रामुख्याने भोसरी, पिंपरी, कोथरूड, पर्वती, केडगाव, नगर रस्ता, पद्मावती, रास्तापेठ या विभागांमध्ये वीजचोरीविरोधात धडक कारवाई करून वीजचोरीचे प्रकार उघड करण्यात आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १०९६ ठिकाणी ३ कोटी ९९ लाख रुपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. गेल्या चार दिवसांत सुमारे २४० अभियंता, कर्मचाऱ्यांनी विविध पथकांद्वारे वाघोली परिसर, ताथवडे, पिंपळे निलख, हिंजवडी, भेकराईनगर, मांजरी, उंड्री पिसोळी, वारजे, कात्रज आदी भागात वीजचोरी विरोधी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये १४२ ठिकाणी सुमारे ५३ लाख रुपयांच्या वीजचोऱ्या आढळून आल्या आहेत. यामध्ये पिंपरी विभागाने ५४ तर पद्मावती विभागाने ५१ वीजचोऱ्या उघडकीस आणल्या. मोहिमेत प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार, प्रकाश राऊत यांच्यासह संबंधित विभागांचे कार्यकारी अभियंता, अभियंते आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msedcl cracks down on power thieves abn
First published on: 04-02-2021 at 01:14 IST