पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ‘पार्सल’ सेवेच्या माध्यमातून पाठवलेल्या वस्तू वेळेत पोहोचत नसून, वस्तू गहाळ आणि मोडतोड होण्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी आता पार्सल सेवेची जबाबदारी चालक आणि वाहकांवर निश्चित करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. ‘एसटी’ महामंडळाच्या नियोजन आणि पणन विभागाच्या महाव्यवस्थापकांनी राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
‘एसटी’कडून प्रवासी सेवेबरोबरच पार्सल सेवाही दिली जाते. त्यासाठी राज्य सरकारने एक जानेवारी २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२७ या कालावधीसाठी खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. या कंपनीमार्फत वस्तू-सामान-साहित्याची वाहतूक सेवा पुरवली जात आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या सेवेला गालबोट लागल्याचे दिसून येत आहे. पाठविलेली वस्तू किंवा सामान वेळेत पोहोचविण्यात दिरंगाई होत असून, काही वस्तू गहाळ होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत. वस्तूंची मोडतोड होण्याचेही प्रमाण वाढले आहे. पावती न देता वस्तूंची परस्पर सेवा पुरविण्याचेही प्रकार निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, पार्सल गहाळ वा खराब झाल्यास किंवा विलंबाने पोहोचल्यास त्याची जबाबदारी चालक आणि वाहक यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे.
मार्गावर एसटी नादुरुस्त झाल्यास पर्यायी बस मागवून प्रवाशांची व्यवस्था केली जाते. अशा वेळी पार्सल स्थलांतरित केले जात नसल्याचे आढळून आले आहे. आता असे पार्सल चालक आणि वाहकांना स्थलांतरित करावे लागणार आहे. बेकायदा पार्सलची तपासणी स्थानिक पथकांकडून केली जाणार आहे.
चालक, वाहकांना सूचना
महामंडळाकडून चालक आणि वाहकांना सूचना देण्यात आल्या आहेत. पार्सलवर परवानाधारक कंपनीची पावती आहे, की नाही, याची खातरजमा करून घ्यावी, जीएसटी क्रमांक असलेली पावती स्वीकारावी, कागदवार लिहून दिलेल्या पावत्यांचा स्वीकार करू नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
नियोजन व पणन विभागाच्या महाव्यवस्थापकांचे पत्र मिळाले असून, आगार प्रमुखांना आणि पार्सल सेवा विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. सूचनांची काटेकोटर अंमलबजावणी करण्यात येत आहे. – अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, पुणे</strong>