पुणे : इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियम कंपन्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) देण्यात येणारी इंधन दर सवलत ३० पैशांनी वाढविण्यास सहमती दर्शवली आहे. त्याचा फायदा एसटी महामंडळाला होणार असून, केवळ इंधनासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चामध्ये वार्षिक १२ कोटी रुपयांची बचत होणार आहे.

एसटी महामंडळाच्या ताफ्यातील पेट्रोल आणि डिझेल इंधऩावरील बसची संख्या सर्वाधिक आहे. या इंधनासाठी कंपन्यांनी सवलतीत वाढ करण्याबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मागणी केली होती. अखेर ही मागणी मान्य झाली आहे.

राज्यभरातील एसटी महामंडळाच्या २५१ आगारांमध्ये पेट्रोल, डिझेल इंधनावर आधारित बससाठी राज्यभरातून १० कोटी ७७ लाख रुपयांचे इंधन खर्च होते. एसटी महामंडळ पेट्रोल, डिझेल कंपन्यांसाठी गेल्या ७० वर्षांपासून मोठे ग्राहक असल्याने या कंपन्या प्रति लिटरमागे दोन रुपये ७० पैसे एवढी सवलत देत होत्या. यातील काही कंपन्यांनी सवलत देण्यास नकार दिला होता, तर काही कंपन्यांकडे मागणी करण्यात आली होती. कंपन्यांनी प्रति लिटर ३० पैसे सवलत वाढवून देण्यास सहमती दर्शविली. त्यामुळे आता पेट्रोल, डिझेल इंधनासाठी प्रति लिटरमागे ३ रुपये सवलत मिळणार आहे. त्यामुळे वर्षाला एसटी महामंडळाचे सरासरी १२ कोटी रुपयांची अतिरिक्त बचत होणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी पैशांची बचत करणे शक्य आहे, त्या ठिकाणी बचत करण्यात येत आहे. तिकिट विक्रीव्यतिरिक्त उत्पन्नाचे इत स्रोतही निर्माण करणे गरजेचे आहे. अशा बचतीचे निर्णय घेतल्यास एसटी महामंडळ आर्थिक सक्षम होईल. – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाटाघाटीत निविदेचा प्रस्ताव आणि…

भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि इतर पेट्रोल, डिझेल पुरविणाऱ्या कंपन्यांना सवलत देण्यासाठी गेल्या तीन ते चार वर्षांपासून मागणी करण्यात येत होती. सरनाईक यांनी नुकतीच या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. खासगी कंपन्यांबरोबर आणि पेट्रोल-डिझेल पुरवठा करणाऱ्या कंपन्यांबरोबर वाटाघाटी करून स्पर्धात्मक निविदा काढण्याच्या हालचाली सुरू केल्या, अखेर संबंधित कंपन्यानी ३० पैसे सवलत वाढवून देण्यास सहमती दर्शवली असल्याचे सरनाईक यांच्याकडून सांगण्यात आले.